Home Cities जळगाव महायुतीची जोरदार सुरूवात : रणधुमाळी सुरू होण्याआधीच बारा जागा बिनविरोध !

महायुतीची जोरदार सुरूवात : रणधुमाळी सुरू होण्याआधीच बारा जागा बिनविरोध !


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आज अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी भाजप-शिवसेना महायुतीने जोरदार आगेकूच कायम राखत तब्बल बारा जागा बिनविरोध निवडून आणत धडाक्यात प्रारंभ केला आहे. यामुळे निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्याआधीच महायुतीने जोरदार सुरूवात केल्याचे मानले जात आहे.

जळगाव महापालिकेत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीची महायुती झालेली आहे. तिन्ही पक्ष एकत्रीतपणे निवडणुकीला सामोरे जात आहेत. निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्याआधीच प्रभाग क्रमांक- 12 ब मधून भाजपच्या उज्वला बेंडाळे यांच्या विरोधातील अर्ज बाद झाल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

काल माघारीच्या दिवशी सकाळी प्रभाग क्रमांक-18 मधून डॉ. गौरव चंद्रकांत सोनवणे यांच्या विरोधातील उमेदवाराने अर्ज मागे घेतल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. यानंतर शिवसेनेचेच मनोज सुरेश चौधरी आणि प्रतिभा गजानन देशमुख हे उमेदवार प्रभाग क्रमांक-आठ मधून बिनविरोध निवडून आले.

आज अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी सकाळीच सागर शाम सोनवणे हे शिवसेनेचे उमेदवार प्रभाग क्रमांक-दोनमधून बिनविरोध झाले. यानंतर भाजपचे उमेदवार तथा आ. राजूमामा भोळे यांचे सुपुत्र विशाल भोळे हे प्रभाग क्रमांक 7-अ मधून विरोधी उमेदवाराने अर्ज मागे घेतल्याने बिनविरोध निवडून आले. याच प्रभागातील भाजपच्या उमेदवार दीपमाला काळे यांची देखील बिनविरोध निवडून आले. तर प्रभाग क्रमांक 16 मधून भाजपचे डॉ. विरन खडके यांच्या विरोधातील महाविकास आघाडीच्या उमेदवाराने अर्ज मागे घेतल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड निश्चीत झाली आहे. यानंतर शेवटच्या क्षणांमध्ये प्रभाक क्रमांक 13 मधून वैशाली अमित पाटील यांच्या विरोधातील उमेदवाराने अर्ज मागे घेतल्यामुळे त्यांची देखील बिनविरोध निवड निश्चीत झाली आहे. तर प्रभाग क्रमांक 7-ब मधून अंकिता पंकज पाटील यांची देखील बिनविरोध निवड झाली आहे.

दरम्यान, अर्ज मागे घेण्याची मुदत अंतिम टप्प्यात असतांनाच प्रभाग क्रमांक 19-अ मधून शिवसेनेचे विक्रम उर्फ गणेश सोनवणे यांच्या विरोधातील उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. यामुळे त्यांची देखील बिनविरोध निवड निश्चीत झाली आहे.

या माध्यमातून आज अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी शिवसेनेचे सहा तर भाजपचे सहा असे एकूण बारा उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. यामुळे आता उर्वरित 63 जागांसाठी निवडणूक होणार असल्याचे निश्चीत झाले आहे.


Protected Content

Play sound