जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | शहरातील क्रीडाप्रेमींचे लक्ष वेधून घेणाऱ्या ‘वीर गुर्जर क्रिकेट लीग’च्या दुसऱ्या सत्राचा अंतिम सामना नुकताच पार पडला. या चुरशीच्या लढतीत अथर्व ट्रॅव्हल्स संघाने उत्कृष्ट कामगिरीचे प्रदर्शन करत ‘क्वालिटी मेटल्स सतखेडा’ संघाचा ३९ धावांनी पराभव केला. या विजयासह अथर्व ट्रॅव्हल्सने सलग दुसऱ्या वर्षी विजेतेपदावर आपले नाव कोरले आहे.

२४ ते २८ डिसेंबर दरम्यान आयोजित या स्पर्धेचा समारोप आणि बक्षीस वितरण सोहळा राज्याचे पाणीपुरवठा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी बोलताना पालकमंत्र्यांनी खेळाडूंच्या खिलाडूवृत्तीचे कौतुक केले आणि ग्रामीण भागातील अशा स्पर्धांमुळे स्थानिक कौशल्याला वाव मिळतो, असे प्रतिपादन केले.

अंतिम सामन्यात अथर्व ट्रॅव्हल्सने प्रतिस्पर्धी क्वालिटी मेटल्स संघासमोर तगडे आव्हान उभे केले होते. प्रत्युत्तरात क्वालिटी मेटल्सचा संघ निर्धारित लक्ष्यापर्यंत पोहोचू शकला नाही आणि त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. तसेच या स्पर्धेत वंदे मातरम् आणि वैदीक आव्हाणे या दोन्ही संघांनी तृतीय क्रमांक विभागून घेतला.
या सोहळ्याला मान्यवरांची मोठी उपस्थिती होती. यात पालकमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक नवलसिंह राजे पाटील, नगराध्यक्षा नम्रता पाटील, सुनील चौधरी, मनोज पाटील, अजय पाटील, डॉ. चंद्रशेखर पाटील आणि इतर मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी अथर्व ट्रॅव्हल्सचे प्रायोजक विशाल पाटील, ललित पाटील, निवृत्ती पाटील आणि त्यांच्या टीमने विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल्ल पाटील यांनी केले, तर नचिकेत चौधरी यांनी उपस्थितांचे आभार मानले.



