जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव महानगरपालिकेच्या ७५ जागांसाठी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवारी ३० डिसेंबर रोजी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी इच्छुकांची मोठी झुंबड उडाली होती. त्यानंतर आज, बुधवारी ३१ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजेपासून महापालिका प्रशासनाकडून प्राप्त अर्जांच्या छाननी प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे.
७५ जागांसाठी १०३८ अर्जांचा डोंगर:
महापालिकेच्या एकूण ७५ जागांसाठी तब्बल १०३८ उमेदवारांनी आपली दावेदारी सादर केली आहे. प्रत्येक जागेसाठी सरासरी १४ उमेदवार रिंगणात असल्याने ही स्पर्धा अत्यंत चुरशीची झाली आहे. या सर्व अर्जांची तांत्रिक आणि कायदेशीर वैधता तपासण्याचे मोठे आव्हान निवडणूक विभागासमोर आहे. यासाठी महापालिका आवारात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे एकूण ६ स्वतंत्र कक्ष उभारण्यात आले असून, प्रत्येक कक्षात अर्जांची अत्यंत बारकाईने तपासणी केली जात आहे.

छाननी प्रक्रियेला सुरूवात :
छाननी प्रक्रियेला सुरुवात होताच विविध प्रभागांतील उमेदवारांनी एकमेकांविरुद्ध हरकती घेण्यास सुरुवात केली आहे. अनेक उमेदवारांनी आपले अर्ज बाद होऊ नयेत किंवा प्रतिस्पर्ध्याचा अर्ज कसा तांत्रिकदृष्ट्या अवैध आहे, हे सिद्ध करण्यासाठी चक्क वकिलांची फौज सोबत आणली होती. शपथपत्रातील त्रुटी, गुन्ह्यांची माहिती दडवणे किंवा आरक्षणाचे दाखले यांसारख्या मुद्द्यांवरून आक्षेप नोंदवले जात आहेत. यामुळे पालिका प्रशासनात युक्तिवादाचा मोठा पेच पाहायला मिळत आहे.
प्रशासन सतर्क, पोलीस बंदोबस्त तैनात:
निवडणूक निर्णय अधिकारी प्रत्येक हरकत गांभीर्याने नोंदवून घेत असून, नियमानुसार त्या समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न कर्मचारी करत आहेत. छाननीच्या पार्श्वभूमीवर महापालिका परिसरात उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांची तोबा गर्दी झाली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे. आज संध्याकाळपर्यंत कोणाचे अर्ज मंजूर होतात आणि कोणाचे स्वप्न भंगते, याकडे संपूर्ण जळगाव शहराचे लक्ष लागले आहे. या प्रक्रियेनंतरच खऱ्या अर्थाने निवडणुकीचे रणांगण कोणासाठी मोकळे होणार, याचे चित्र स्पष्ट होईल.



