Home उद्योग पारोळ्यात ‘खना खजाना’ आनंद मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद; महिला बचत गट व गृहउद्योगांना...

पारोळ्यात ‘खना खजाना’ आनंद मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद; महिला बचत गट व गृहउद्योगांना नवे व्यासपीठ

0
123

पारोळा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महिला बचत गट व गृहउद्योगांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने लाडशाखीय वाणी समाज मंडळ व संस्कृती महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला एकदिवसीय ‘खना खजाना’ आनंद मेळावा पारोळा येथील वाणी मंगल कार्यालयात मोठ्या उत्साहात पार पडला. या मेळाव्यामुळे महिलांच्या कलागुणांना बाजारपेठ उपलब्ध होत आर्थिक स्वावलंबनाची नवी दिशा मिळाल्याचे चित्र दिसून आले.

या आनंद मेळाव्याचे उद्घाटन वाणी समाज मंडळाचे उपाध्यक्ष हेमकांत मुसळे व सौ. सीमा मुसळे यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटनानंतर मेळाव्यात सहभागी झालेल्या महिलांनी मोठ्या उत्साहात विविध प्रकारचे स्टॉल्स उभारले. खाद्यपदार्थ, कला व हस्तकौशल्याच्या वस्तू, सुती विणकामातून साकारलेल्या वस्तू, मोत्यांपासून तयार केलेली दागिने, पूजा साहित्य, संक्रांतीसाठी वाणाच्या वस्तू, गृहोपयोगी साहित्य तसेच घर सजावटीच्या विविध वस्तूंनी मेळावा आकर्षक बनला होता.

मेळाव्यास भेट देणाऱ्या बंधू-भगिनींनी खरेदीचा तसेच विविध चविष्ट पदार्थांचा मनसोक्त आनंद घेतला. महिलांनी स्वतः तयार केलेल्या वस्तूंना चांगली मागणी मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आत्मविश्वास स्पष्टपणे दिसून आला. अनेक महिलांनी या माध्यमातून प्रथमच आपली उत्पादने विक्रीसाठी सादर केल्याचे सांगितले.

मेळाव्याबाबत प्रतिक्रिया देताना सहभागी महिलांनी सांगितले की, या उपक्रमातून आम्हाला व्यवसायाची नवी दिशा मिळाली आहे. घरगुती पातळीवर छोटे व्यवसाय करूनसुद्धा कुटुंबाच्या आर्थिक प्रगतीत हातभार लावता येतो, याची जाणीव या मेळाव्यामुळे झाली. अशा उपक्रमांमुळे महिलांचा आत्मविश्वास वाढून त्यांना स्वावलंबनाकडे वाटचाल करण्याची प्रेरणा मिळते, असेही त्यांनी नमूद केले.

या मेळाव्याचे आयोजन महिला मंडळाच्या अध्यक्षा प्रा. वर्षा प्रकाश पुरकर यांच्यासह रुणल कोतकर, दिपिका शेंडे, वर्षा कोठावदे व मंडळातील सर्व सभासद भगिनींनी परिश्रमपूर्वक केले. वाणी समाज संचालक मंडळाचे अध्यक्ष विजय नावरकर, उपाध्यक्ष हेमकांत मुसळे, सचिव महेंद्र कोतकर, शरद मेखे सर, राजेंद्र पाखले, रविंद्र शेंडे तसेच मंडळाच्या सर्व सभासदांनी या उपक्रमासाठी मोलाचे सहकार्य केले.

एकूणच ‘खना खजाना’ आनंद मेळाव्यामुळे पारोळ्यातील महिला बचत गट व गृहउद्योगांना हक्काचे व्यासपीठ मिळाले असून, महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी असा उपक्रम प्रेरणादायी ठरल्याची भावना उपस्थितांमध्ये व्यक्त होत होती.


Protected Content

Play sound