मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर येथे शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनच्या १६व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात पत्रकारितेच्या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत दैनिक सामना या वृत्तपत्राचे मुक्ताईनगर तालुका प्रतिनिधी गणेश गोविंदराव भोंबे यांना तापी–पूर्णा राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

गणेश भोंबे यांनी १९८९ पासून ‘न्यूज पेपर एजन्सी’च्या माध्यमातून शहरात वृत्तपत्र सेवा सुरू ठेवत सातत्याने निर्भीड, समाजाभिमुख पत्रकारिता केली आहे. त्यांच्या या दीर्घकालीन योगदानाची पोचपावती म्हणून फाउंडेशनच्या वतीने हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी राज्यातील आदर्श प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, पत्रकार, समाजसेवक तसेच क्रीडा व कला क्षेत्रातील एकूण ७५ मान्यवरांना तापी–पूर्णा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

या सोहळ्याचे अध्यक्षपद एरंडोल येथील सुप्रसिद्ध कवी प्रा. वा. ना. आंधळे यांनी भूषविले, तर उद्घाटन खामगाव येथील पांडुरंग दैवज्ञ यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी आदिशक्ती संत मुक्ताई, देवी सरस्वती व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यानंतर शाहीर मनोहर पवार यांनी राज्यगीत सादर करत कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात केली.
सन्मान सोहळ्यात पुरस्कारार्थींना शाल, स्मृतिचिन्ह व गुलाब पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. उज्जैनकर फाउंडेशनचे गौरवगीत बार्शी (सोलापूर) येथील कवी अशोक मोहिते यांनी व्हिडिओ क्लिपद्वारे सादर केले. यासोबतच शाहीर मनोहर पवार यांनी फाउंडेशनच्या कार्याचा गौरव करणारा पोवाडा सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. यावेळी मान्यवरांनी फाउंडेशनच्या सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक कार्याचे भरभरून कौतुक केले.
कार्यक्रमात महाराष्ट्राचे माजी महसूल मंत्री आ. एकनाथराव खडसे यांनी भ्रमणध्वनीद्वारे उपस्थित पुरस्कारार्थी विद्यार्थी व फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर यांचे अभिनंदन केले. त्यांच्या शुभेच्छांमुळे उपस्थितांमध्ये अधिकच उत्साह संचारला.
भोजनानंतर दुपारच्या सत्रात मुक्ताईनगर तालुक्यातील इयत्ता दहावी व बारावीतील ७५ गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार सोहळा पार पडला. जळगाव जिल्ह्याचे शिक्षक नेते एस. डी. भिरुड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह, गुलाब पुष्प, स्वामी विवेकानंदांचे पुस्तक व फोटो भेट देण्यात आले.
या प्रसंगी सुप्रसिद्ध कवी डी. बी. जगतपुरिया, शिक्षणमहर्षी एस. ए. भोई, दिनेश पाटील, विनोद सोनवणे, मुक्ताईनगरच्या नवनियुक्त नगरसेविका माधुरी सचिन पाटील, समाजसेवक मनोहर गलवाडे, विनोद डिडवाणीया, प्रा. डॉ. दीपक नागरिक यांच्यासह फाउंडेशनचे राज्य व विभागीय पदाधिकारी, विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी फाउंडेशनच्या कार्यकारिणीने विशेष परिश्रम घेतले.
एकूणच शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनचा हा वर्धापन दिन सोहळा पत्रकारिता, शिक्षण आणि समाजसेवेतील उल्लेखनीय कार्याचा गौरव करणारा ठरला, तसेच गणेश भोंबे यांचा सन्मान हा स्थानिक पत्रकारितेसाठी प्रेरणादायी क्षण ठरला.



