Home Cities जळगाव जागा वाटपावर गुलाबराव देवकरांनी सांगितला ‘हा’ आकडा !

जागा वाटपावर गुलाबराव देवकरांनी सांगितला ‘हा’ आकडा !

0
111

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. महायुतीमध्ये जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात असतानाच, माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) किती जागांवर निवडणूक लढवणार, याचे गुपित उघड केले आहे. जळगाव मनपाच्या एकूण ७५ जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसला ६ जागा मिळाल्या असून, पक्ष या जागांवर महायुतीच्या माध्यमातून पूर्ण ताकदीने उतरणार असल्याचे देवकर यांनी स्पष्ट केले.

मंगळवारी, ३० डिसेंबर रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना गुलाबराव देवकर बोलत होते. यावेळी त्यांनी सांगितले की, “महायुतीच्या जागावाटपात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला ६ जागा आल्या आहेत. या जागांवर आमचे उमेदवार निवडणूक लढवतील. मात्र, महायुतीचे इतर दोन घटक पक्ष म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना (शिंदे गट) नेमक्या किती जागांवर लढत आहेत, याची अधिकृत माहिती मला नाही.”

अभिषेक पाटलांच्या राजीनाम्यावर भाष्य
गेल्या काही दिवसांपासून जळगाव राष्ट्रवादीत अंतर्गत नाराजी उफाळून आल्याच्या चर्चा होत्या. त्यातच महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने खळबळ उडाली होती. यावर विचारले असता देवकर म्हणाले की, “अभिषेक पाटील यांनी काही तांत्रिक किंवा वैयक्तिक गैरसमजातून राजीनामा दिला असावा. ते पक्षाचे महत्त्वाचे पदाधिकारी आहेत. त्यांच्या राजीनाम्याबाबतचा अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील, त्यामुळे कार्यकर्त्यांनी गोंधळून जाऊ नये.”

महायुतीची रणनीती
जळगाव महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी महायुतीने कंबर कसली आहे. राष्ट्रवादीला मिळालेल्या ६ जागांवर निवडून येण्याची क्षमता असलेले उमेदवार दिले जातील, असेही देवकर यांनी यावेळी सूचित केले. ७५ जागांच्या या महापालिकेत आता उर्वरित ६९ जागांवर भाजप आणि शिवसेनेचा काय फॉर्म्युला ठरतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने, देवकर यांच्या या विधानामुळे राष्ट्रवादीच्या गोटात हालचालींना वेग आला असून, पक्ष आता अधिकृतपणे आपल्या उमेदवारांच्या प्रचारात उतरणार आहे.


Protected Content

Play sound