भूतान-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । क्रिकेटच्या मैदानावर दररोज नवे विक्रम जन्माला येत असतात, मात्र काही कामगिरी अशा असतात ज्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदल्या जातात. विशेषतः टी-२० सारख्या आक्रमक आणि फलंदाजप्रधान फॉरमॅटमध्ये गोलंदाजांसाठी चमक दाखवणे अत्यंत कठीण मानले जाते. मात्र अशाच छोट्या फॉरमॅटमध्ये एका युवा गोलंदाजाने अशक्यप्राय वाटणारा पराक्रम करून संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष वेधून घेतले आहे.

भूतान आणि म्यानमार यांच्यात झालेल्या आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात गोलंदाजीतील नवा वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित झाला. या सामन्यात भूतानने प्रथम फलंदाजी करत २० षटकांत १२७ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना म्यानमारचा संघ भूतानच्या भेदक गोलंदाजीसमोर पूर्णपणे अपयशी ठरला आणि अवघ्या ४५ धावांत गारद झाला.

या सामन्याचा नायक ठरला भूतानचा युवा गोलंदाज सोनम येशे. त्याने आपल्या चार षटकांच्या स्पेलमध्ये अवघ्या ७ धावा देत तब्बल ८ विकेट्स घेतल्या. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत फोर किंवा फायव्ह विकेट हॉललाच मोठी कामगिरी मानले जात होते, मात्र सोनम येशेने ८ विकेट्स घेत इतिहास रचला आणि नवा मापदंड प्रस्थापित केला.
२२ वर्षीय सोनम येशे हा आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये ८ विकेट्स घेणारा पहिला गोलंदाज ठरला आहे. याआधी पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात दोन गोलंदाजांनी प्रत्येकी ७ विकेट्स घेतल्या होत्या. मलेशियाच्या स्याझरुल इद्रुस याने २०२३ मध्ये चीनविरुद्ध ७ विकेट्स घेतल्या होत्या, तर बहरीनच्या अली दाऊद याने भूतानविरुद्ध अशीच कामगिरी केली होती. मात्र या दोघांचाही विक्रम सोनम येशेने मागे टाकला आहे.
या ऐतिहासिक कामगिरीमुळे भूतान क्रिकेटसाठीही हा क्षण अभिमानाचा ठरला असून, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भूतानचे नाव ठळकपणे चर्चेत आले आहे. टी-२० क्रिकेटमध्ये गोलंदाजही सामना एकहाती फिरवू शकतो, हे सोनम येशेने आपल्या अप्रतिम कामगिरीतून पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.
एकूणच, चार षटकांत केवळ सात धावा देत आठ विकेट्स घेणारी ही कामगिरी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात मैलाचा दगड ठरणार असून, भविष्यात हा विक्रम मोडणे अत्यंत अवघड ठरेल, असे क्रिकेट जाणकारांचे मत आहे.



