जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत महाविकास आघाडीने आपला पत्ता उघड केला असून जागावाटपाचा महत्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे. या निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष ३८ जागांवर, तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष ३७ जागांवर निवडणूक लढविणार आहे. माजी आमदार संतोष चौधरी यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत या युतीची अधिकृत घोषणा केली.
स्वबळाची चर्चा थांबली, युतीवर शिक्कामोर्तब
काही दिवसांपूर्वी दोन्ही पक्षांकडून स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचे संकेत दिले जात होते. मात्र, भाजप-शिवसेना महायुतीला कडवे आव्हान देण्यासाठी अखेर दोन्ही पक्षांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. माजी आमदार संतोष चौधरी यांनी शिवसेना (उबाठा) नेत्यांशी सविस्तर चर्चा करून हा जागावाटपाचा ‘३८-३७’ असा फॉर्म्युला तयार केला आहे. जळगाव पालिकेच्या एकूण ७५ जागांसाठी ही आघाडी आता मैदानात उतरणार आहे.

मित्रपक्षांनाही मिळणार स्थान
पत्रकार परिषदेत बोलताना संतोष चौधरी यांनी स्पष्ट केले की, हे जागावाटप दोन्ही मुख्य पक्षांमध्ये झाले असले तरी, आघाडीतील इतर घटक पक्षांनाही सोबत घेतले जाईल. ज्या जागा ज्या पक्षाला सुटल्या आहेत, त्यातून आपल्या मित्रपक्षांना जागा सोडण्याचा निर्णय संबंधित पक्षप्रमुख घेतील. “आम्ही इतर लहान पक्षांशी देखील चर्चा करत आहोत, सोयीनुसार जागांची फेररचना केली जाईल,” असेही चौधरी यांनी यावेळी नमूद केले.
दिग्गज नेत्यांची उपस्थिती
या महत्वपूर्ण पत्रकार परिषदेला शिवसेनेचे संपर्कप्रमुख संजय सावंत, माजी खासदार उमेश दादा पाटील, पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार, एजाज मलिक, शिवसेना (ठाकरे गट) महानगर प्रमुख शरद तायडे, संग्राम पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. महाविकास आघाडीच्या या निर्णयामुळे निवडणुकीत आता थेट लढत होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
एकीकडे महायुतीमध्ये जागावाटपाचा पेच सुरू असताना, महाविकास आघाडीतील घटक पक्षाने जागांचा फॉर्म्युला जाहीर करून आघाडी घेतल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. आता या नव्या समीकरणामुळे जळगावच्या राजकारणात कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



