
जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत महायुतीमधील जागावाटपाचा तिढा सुटण्याऐवजी अधिकच गुंतागुंतीचा होताना दिसत आहे. आज, रविवारी २८ डिसेंबर रोजी शहरातील शासकीय अजिंठा विश्रामगृह येथे महायुतीच्या मित्रपक्षांची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र, बैठकीतून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधून तेथून काढता पाय घेतल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

भाजप-शिवसेना युतीची घोषणा, पण राष्ट्रवादी ‘नाराज’
दोन दिवसांपूर्वीच भाजपचे आमदार मंगेश चव्हाण आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजप व शिवसेना (शिंदे गट) यांच्या युतीची अधिकृत घोषणा केली होती. मात्र, या प्रक्रियेत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) अद्यापही बाजूला असल्याचे चित्र आहे. आमदार अनिल पाटील यांनी यापूर्वीच ‘समाधानकारक जागा न मिळाल्यास स्वबळावर लढू’ असा इशारा दिल्याने महायुती होईल की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
जागांचा अवाजवी दावा आणि राष्ट्रवादीची कोंडी
जळगाव महानगरपालिकेच्या ७५ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. असे असताना भाजपने चक्क ५० ते ६० जागांवर आपला दावा ठोकला आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला अत्यंत कमी जागा येण्याची शक्यता निर्माण झाल्याने अजित पवार गट आक्रमक झाला आहे. दुसरीकडे, मंत्री गिरीश महाजन यांनी ‘जागावाटप निश्चित झाल्यावरच एबी फॉर्म दिले जातील’ असे स्पष्ट केल्याने उमेदवारांमध्येही संभ्रमावस्था आहे.
अजिंठा विश्रामगृहावर नाट्यमय घडामोडी
आज दुपारी १ वाजेपासून सुरू झालेल्या या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बैठकीला आमदार मंगेश चव्हाण, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन लढ्ढा यांसह दिग्गज नेते उपस्थित होते. मात्र, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी बैठकीतून अर्ध्यावरच बाहेर पडणे हे जागावाटपाचा तोडगा निघाला नसल्याचे संकेत मानले जात आहेत.
आता सर्वांचे लक्ष निर्णयाकडे
अजित पवार गटाच्या नेत्यांचे म्हणणे आहे की, जोपर्यंत सन्मानजनक जागांचा आकडा समोर येत नाही, तोपर्यंत युतीवर शिक्कामोर्तब करणे कठीण आहे. इच्छुक उमेदवारांची संख्या मोठी असल्याने प्रत्येक पक्ष जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्याच्या प्रयत्नात आहे. आता या पेचातून महायुती मार्ग काढणार की जळगावात राष्ट्रवादी स्वतंत्रपणे लढून ‘मैत्रीपूर्ण’ लढत होणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.



