Home Cities अमळनेर ‘बेगाने की शादी मे अब्दुल्ला दिवाना’; आ. अनिल पाटीलांची बोचरी टिका

‘बेगाने की शादी मे अब्दुल्ला दिवाना’; आ. अनिल पाटीलांची बोचरी टिका

0
160

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।अमळनेर नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर स्थानिक राजकारण चांगलेच तापले आहे. शिवसेना (शिंदे गट) पुरस्कृत नगराध्यक्ष निवडून आल्यानंतर माजी आमदारांकडून साजऱ्या करण्यात येत असलेल्या आनंदोत्सवाचा माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांनी समाचार घेतला आहे. “दुसऱ्याच्या लग्नात नाचणाऱ्या अब्दुल्लासारखी तुमची अवस्था झाली आहे,” अशा शब्दांत टोला लगावत त्यांनी विरोधकांच्या ‘क्रेडिट वॉर’वर जोरदार हल्ला चढवला.

तुमच्या क्रेडिटवर नाही, तर वैयक्तिक कामावर विजय
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात आमदार अनिल पाटील म्हणतात की, नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कोणाच्या जीवावर निवडून आला, याचे माजी आमदारांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. जनतेला सर्व ठाऊक असून हा विजय म्हणजे तुमचे वैयक्तिक यश नाही. जे नगरसेवक निवडून आले आहेत, ते त्यांच्या प्रभागातील वर्षानुवर्षांच्या कामाच्या जोरावर आले आहेत. त्याचे फुकटचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नका, असा सल्ला त्यांनी दिला.

स्मिता वाघ आणि साहेबराव दादा आमच्याच सोबत
विरोधकांकडून केल्या जाणाऱ्या दाव्यांचा फोलपणा उघड करताना आमदार पाटील म्हणाले की, खासदार स्मिताताई वाघ आणि माजी आमदार साहेबराव दादा हे आमच्यासोबतच होते आणि भविष्यातही राहतील. जनता दुधखुळी नाही, त्यांना कोणाची साथ कोणाला होती हे स्पष्टपणे दिसत आहे. तसेच, नंदुरबारमधील तुमच्या अपयशाची आठवण करून देताना ते म्हणाले की, तेथील जनतेने तुम्हाला ओळखले असल्याने तिथे तुमचा पराभव झाला, तुमच्या मुलाला मिळालेली मते त्याची साक्ष देतात.

विकासाच्या व्हिजनवर लक्ष द्या
आरोपांना उत्तर देताना आ. पाटील यांनी शहराच्या विकासाचा मुद्दा उपस्थित केला. “मी शहरासाठी २४ बाय ७ पाणीपुरवठा योजना, रस्त्यांसाठी कोट्यवधींचा निधी मंजूर करून आणला आहे. आता ही कामे वेळेत पूर्ण करण्याकडे लक्ष द्या. निवडणूक जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनानुसार प्रॉपर्टी टॅक्स कमी करा. तुमच्या नगरसेवकांना निधी मिळवून द्या, त्यासाठी माझे पूर्ण सहकार्य राहील,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

मंत्रिपदाची चिंता सोडा; मी सक्षम आहे!
शेवटी, आपल्या मंत्रिपदावरून टीका करणाऱ्यांना उत्तर देताना आमदार पाटील म्हणाले की, “तुम्हाला माझ्या मंत्रिपदाची चिंता आहे की धाक, हेच मला कळत नाही. पण काळजी करू नका, मी आजही या भूमीचा विकास करण्यासाठी आमदार म्हणून सक्षम आहे. तुम्ही ‘नंदुरबारकर’ आहात, त्यामुळे तिकडेच अधिक लक्ष द्या. येणाऱ्या काळात मोठे बदल दिसतील, फक्त ‘वेट अँड वॉच’ करा.”
अमळनेरच्या जनतेसाठी मी रात्रंदिवस तत्पर असून विकासाचा हा गाडा थांबणार नाही, अशी ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली.


Protected Content

Play sound