जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तींचे विनियमन) अधिनियम, २०१७ अंतर्गत राज्य शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन परिपत्रकांची जळगाव जिल्ह्यात प्रभावी व एकसमान अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी नाथजानकी फाउंडेशनतर्फे करण्यात आली. यासंदर्भातील निवेदन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांना शुक्रवार, २६ डिसेंबर रोजी देण्यात आले.

महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागामार्फत निर्गमित परिपत्रकांमध्ये आस्थापना चालू ठेवण्याबाबतची वेळ, साप्ताहिक सुटी, २४ तासांचा “दिवस” याची व्याख्या तसेच कर्मचाऱ्यांना सलग २४ तासांची विश्रांती देणे या बाबी स्पष्ट करण्यात आल्या आहेत. हे शासन परिपत्रक राज्यव्यापी स्वरूपाचे असून जळगाव जिल्ह्यातील सर्व दुकाने व आस्थापनांवर तितकेच लागू आहेत, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

जिल्ह्यात काही ठिकाणी या कायद्याच्या अंमलबजावणीबाबत संभ्रम दिसून येत असून एकसमान धोरणाचा अभाव असल्याची तक्रार व्यापारी, उद्योजक व कामगारांकडून केली जात आहे. त्यामुळे कायद्याचे उल्लंघन होण्याची तसेच अनावश्यक वाद निर्माण होण्याची शक्यता वाढत असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित शासन परिपत्रक जळगाव जिल्ह्यास पूर्णतः लागू असल्याचे स्पष्ट निर्देश द्यावेत, तसेच कामगार विभाग, स्थानिक प्रशासन व अंमलबजावणी यंत्रणांना आवश्यक सूचना देऊन प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करावी, अशी विनंती करण्यात आली आहे. यामुळे व्यापारी, उद्योजक आणि कामगार यांच्यातील संभ्रम दूर होऊन कायद्याचे योग्य पालन होण्यास मदत होईल, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
शासकीय परिपत्रानुसार २४ तास दुकाने उघडे ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. परंतु, पोलीस प्रशासनातर्फे रात्री १० वाजताच दुकाने बंद केली जात आहे. ही शासनाच्या परिपत्राची अवहेलना असून ती थांबविण्यात यावी. तसेच दुकानदारांना २४ तास व्यवसाय करु द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनांवर अध्यक्ष दिलीप सिकवाल, उपाध्यक्ष दिक्षा सिकवाल, सचिव हर्षल सिखवाल आदींची स्वाक्षरी आहे.



