Home क्राईम पोलिसांच्या कारवाईत 709 किलोहून अधिक गांजा नष्ट

पोलिसांच्या कारवाईत 709 किलोहून अधिक गांजा नष्ट

0
103

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात मानवी आरोग्यास गंभीर धोका निर्माण करणाऱ्या अंमली पदार्थांविरोधात पोलिसांनी निर्णायक पाऊल उचलत मोठी कारवाई केली आहे. एन.डी.पी.एस. कायद्यान्वये दाखल विविध गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेला तब्बल 709.280 किलोग्रॅम गांजा तसेच गुंगीकारक औषधांचा साठा आज अधिकृत प्रक्रियेनुसार नष्ट करण्यात आला. या कारवाईमुळे जिल्ह्यात अंमली पदार्थविरोधी लढ्याला बळ मिळाले आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या फौजदारी अपील क्रमांक 652/2012 मधील निर्देश तसेच केंद्र सरकार आणि महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालकांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार ही कारवाई करण्यात आली. त्यानुसार जळगाव जिल्ह्यासाठी जिल्हास्तरीय अंमली पदार्थ नाश समितीची स्थापना करण्यात आली असून, या समितीचे अध्यक्ष म्हणून पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. समितीमध्ये अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि पोलीस उपअधीक्षक नितीन गणापुरे हे सदस्य आहेत.

दि. 24 डिसेंबर 2025 रोजी जळगाव जिल्हा घटकातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये एन.डी.पी.एस. कायद्यान्वये दाखल 19 गुन्ह्यांमधील जप्त मुद्देमालाचा नष्ट करण्यात आला. जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या इमारतीमागील मोकळ्या जागेत जिल्हास्तरीय अंमली पदार्थ नाश समितीसमोर कागदपत्रांची सखोल पडताळणी करून ही प्रक्रिया पार पाडण्यात आली. खड्डा खोदून दोन शासकीय पंचांच्या साक्षीने आणि कृषी विभागाच्या उपस्थितीत गांजाचा नाश करण्यात आला.

या संपूर्ण प्रक्रियेत सहाय्यक कृषी अधिकारी अविनाश जगदिश खैरनार, वजनमापे निरीक्षक राजेंद्र व्यवहारे यांची उपस्थिती होती. नाश प्रक्रियेचे संपूर्ण व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आले असून, सर्व कायदेशीर बाबींची काटेकोर अंमलबजावणी करण्यात आली आहे. पारदर्शकता राखण्यासाठी प्रत्येक टप्प्यावर शासकीय नियमांचे पालन करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि पोलीस उपअधीक्षक नितीन गणापुरे यांच्या उपस्थितीत पार पडली. स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार संजय दोरकर, पोलीस हवालदार संदीप पाटील, सुनील दामोदरे, संदीप चव्हाण, जयंत चौधरी, राहुल बैसाने, पोलीस अंमलदार रविंद्र चौधरी, महिला पोलीस हवालदार निता राजपूत तसेच चालक पोलीस हवालदार दर्शन ढाकणे यांनी ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.


Protected Content

Play sound