Home क्राईम बोदवडमधील अवैध दारू दुकाने नगरपंचायतीच्या छत्राखाली? हरिदास गनबास यांचा गंभीर आरोप

बोदवडमधील अवैध दारू दुकाने नगरपंचायतीच्या छत्राखाली? हरिदास गनबास यांचा गंभीर आरोप

0
148

बोदवड-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । बोदवड शहरात सध्या अतिक्रमणाचा मुद्दा चांगलाच तापला असतानाच आता अवैध देशी दारू दुकाने, वाईन शॉप, बिअर बार आणि परमिट रूम यांना नगरपंचायतीकडून अभय दिले जात असल्याचा गंभीर आरोप पुढे आला आहे. या आरोपांमुळे शहरातील प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, नागरिकांमध्ये तीव्र असंतोष व्यक्त केला जात आहे.

बोदवड शहरातील अनेक दारू दुकाने आणि वाईन शॉप्स आवश्यक शासकीय कागदपत्रांची पूर्तता न करता सुरू असल्याचा आरोप आहे. शासनाची तसेच सर्वसामान्य जनतेची फसवणूक करून काही दुकानदारांनी आपल्या स्वार्थासाठी व्यवसाय सुरू ठेवला असून, त्यांना आतापर्यंत काही प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचा पाठिंबा मिळाल्याचा दावा करण्यात येत आहे. या प्रकरणी मलकापूर येथील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहरप्रमुख हरिदास गनबास यांनी राज्य उत्पादन शुल्क विभाग, जळगाव यांच्याकडे लेखी निवेदन देत संबंधित दुकानदारांवर कठोर कारवाई करून परवाने रद्द करण्याची मागणी केली आहे.

या निवेदनात अवैध दुकानदारांना नाहरकत प्रमाणपत्र व परवानग्या देणाऱ्या विभागांचीही चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी स्पष्ट मागणी करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणाची माहिती बोदवड नगरपंचायत प्रशासनालाही देण्यात आल्याचे हरिदास गनबास यांनी नमूद केले आहे.

दरम्यान, बोदवड शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेबाबतही प्रशासनावर एकतर्फी कारवाईचे आरोप होत आहेत. अवैध शासकीय व महसूल जागेवर सुरू असलेल्या दारू दुकानांना मुख्याधिकारी सतीश पुदाके पाठीशी घालत असल्याचा आरोप करण्यात येत असून, अशा दुकानांना अद्याप कोणत्याही प्रकारच्या नोटिसा देण्यात आलेल्या नाहीत. मात्र, ज्यांनी आर्थिक व्यवहार केले नाहीत अशा छोट्या दुकानदारांवर नोटिसा बजावून अतिक्रमण तोडण्याची कारवाई सुरू असल्याची चर्चा शहरात रंगली आहे.

बोदवड शहरात सुमारे एक हजार दुकाने असून, बहुतांश दुकाने अतिक्रमणात असल्याचे सांगितले जाते. रस्त्याच्या कडेला किंवा लहान-मोठ्या नाल्यांवर ही दुकाने उभी असताना नगरपंचायतीला ते दिसत नाही का, की जाणूनबुजून डोळेझाक केली जात आहे, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. गरीब व मध्यमवर्गीयांवर कारवाई करून श्रीमंत दुकानदारांना संरक्षण दिले जात असल्याचा आरोपही जोर धरू लागला आहे.

अतिक्रमण काढायचे असतील तर संपूर्ण शहरात सरसकट कारवाई करावी, अन्यथा मोजक्या दुकानदारांवर कारवाई करून काहीही साध्य होणार नाही, अशी ठाम भूमिका स्थानिक दुकानदारांनी घेतली आहे. प्रांत अधिकारी, भुसावळ यांनी दिलेल्या आदेशानुसार संपूर्ण बोदवड शहरातील अवैध दुकाने व आस्थापनांची चौकशी करून अडथळे दूर करण्याचे निर्देश असतानाही नगरपंचायत केवळ एकतर्फी कारवाई करत असल्याचा आरोप होत आहे.

एका दुकानावर केवळ एक व्यक्ती नव्हे, तर संपूर्ण कुटुंब अवलंबून असते, याचा विचार प्रशासनाने करावा, अशी मागणी हरिदास गनबास यांनी केली आहे. न्याय न मिळाल्यास कायदेशीर मार्गाने लढा दिला जाईल, अशी प्रतिक्रिया दुकानदारांनी दिली असून, या प्रकरणामुळे बोदवड शहरातील वातावरण चांगलेच तापले आहे.

एकंदरीत, बोदवडमधील अवैध दारू दुकाने आणि अतिक्रमण कारवाईतील कथित दुजाभावामुळे नगरपंचायत प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न निर्माण झाले असून, या प्रकरणावर प्रशासन काय भूमिका घेते याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.


Protected Content

Play sound