मुंबई – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । अखेर उध्दव आणि राज या ठाकरे बंधूंच्या युतीवर शिक्कामोर्तब झाले असून याबाबत अधिकृत घोषणा केव्हा होणार ? याबाबतची माहिती देखील समोर आली आहे.
आगामी महापालिका निवडणुकीसाठी उध्दव आणि राज ठाकरे यांचे अनुक्रमे शिवसेना-उबाठा आणि मनसे हे दोन्ही पक्ष एकत्र येणार असल्याची चर्चा कधीपासूनच सुरू आहे. याबाबत दोन्ही बाजूंनी युतीचे संकेत देण्यात आले असले तर अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. यामुळे ही घोषणा केव्हा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. या पार्श्वभूमिवर, आज शिवसेना ठाकरे गटाचे मुख्य प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी महत्वाची घोषणा केली आहे.

आज संजय राऊत यांनी उध्दव आणि राज यांचा एकत्र फोटो सोशल मीडियात शेअर केला असून यावर उद्या दुपारी बारा वाजता असे कॅप्शन देण्यात आले आहे. यामुळे आता बुधवार दिनांक 24 डिसेंबर रोजी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, सूत्रांच्या माहितीनुसार मनसे आणि शिवसेना-उबाठा या दोन्ही पक्षांमध्ये जागा वाटपाचे सूत्र फायनल झाले असले तरी काही जागांवर मात्र गाडे अडले आहे. याबाबतची बोलणी आजच पूर्ण होणार असून मग उद्या याबाबत घोषणा होणार आहे.



