रेमंड कर्मचारी पतपेढी आता ‘हायटेक’! ना. गिरीश महाजन यांच्याहस्ते QR कोडचे अनावरण


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव येथील ‘रेमंड न्यू लॅन्ट कर्मचारी सहकारी पतपेढी’ने डिजिटल युगाकडे पाऊल टाकत आपल्या सभासदांसाठी ‘QR कोड’ ही नवीन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेचा भव्य प्रकाशन सोहळा मुंबई येथील ‘सेवासदन’ बंगला येथे जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला. जळगाव पीपल्स को-ऑप. बँक आणि कामगार उत्कर्ष सभा यांच्या विशेष सहकार्याने हा उपक्रम राबवण्यात आला आहे.

डिजिटल व्यवहारांना मिळणार बळ आजच्या धावपळीच्या युगात कर्मचारी बांधवांना पतपेढीमध्ये पैसे भरण्यासाठी लागणारा वेळ वाचावा आणि व्यवहार अधिक पारदर्शक व्हावेत, या उद्देशाने ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. या नव्या QR कोडमुळे आता कर्मचाऱ्यांना पतपेढीत पैसे जमा करणे अत्यंत सुलभ, जलद आणि सुरक्षित होणार आहे. सहकारी संस्थांमध्ये डिजिटल तंत्रज्ञानाचा असा वापर ग्रामीण आणि औद्योगिक स्तरावर बदलाचे संकेत देणारा ठरत आहे.

मान्यवरांची उपस्थिती आणि गौरव या कार्यक्रमाला कामगार उत्कर्ष सभेचे जनरल सेक्रेटरी तुकाराम आंब्रे यांची प्रमुख उपस्थिती होती. उद्घाटनप्रसंगी ना. गिरीश महाजन यांनी पतपेढीच्या या निर्णयाचे स्वागत केले. “सहकारी संस्थांनी काळाप्रमाणे बदलून तंत्रज्ञानाचा स्वीकार करणे ही काळाची गरज आहे,” असे म्हणत त्यांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले.

यांचे लाभले सहकार्य हा QR कोड कार्यान्वित करण्यासाठी जळगाव पीपल्स बँकेचे गोविंद खांदे (PRO), मनोज जाधव (पुणे), प्रवीण वाणी, दीपक शिरनामे, सुजित पाटील आणि बँकेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. या सोहळ्याला पतपेढीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, सचिव आणि सर्व संचालक मंडळाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.