जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शेतीत टिकाव आणि उत्पादनवाढ साधायची असेल तर केवळ अनुभव नव्हे, तर वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारणं अत्यावश्यक आहे, असा ठाम संदेश जैन हिल्स येथे सुरू असलेल्या ‘राष्ट्रीय सिट्रस सिम्पोजियम-२०२५’मधून शेतकरी आणि अभ्यासकांना मिळत आहे. लिंबूवर्गीय फळपिकांच्या भविष्यासाठी रोगमुक्त, प्रमाणित आणि गुणवत्तापूर्ण रोपांची निवड किती महत्त्वाची आहे, यावर देश-विदेशातील तज्ज्ञांनी सखोल मांडणी केली.
जैन हिल्सच्या माध्यमातून दोन दिवस चाललेल्या या राष्ट्रीय परिषदेत परभणी येथील मराठवाडा कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. अशोक धवन यांनी शेतकऱ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारण्याचे आवाहन केले. बंदिस्त आणि नियंत्रित वातावरणात मातृवृक्षांपासून तयार केलेली रोगमुक्त रोपे लागवडीसाठी वापरणे अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पहिल्या काही वर्षांत झाडे चांगली दिसली तरी पुढील पाच-सहा वर्षांत कीड व रोगांचा प्रादुर्भाव होऊन फुलोरा व उत्पादनावर विपरीत परिणाम होतो, हा शेतकऱ्यांचा अनुभव असून यामागे अप्रमाणित रोपांची निवड कारणीभूत ठरत असल्याचे त्यांनी नमूद केले.
देशातील संत्रा, मोसंबी आणि लिंबू यांसारख्या लिंबूवर्गीय फळ उत्पादनाला नवी दिशा देण्यासाठी इंडियन सोसायटी ऑफ सिट्रीकल्चर आणि जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. बडिहांडा आणि परिश्रम सभागृहात पार पडलेल्या तांत्रिक सत्रांमध्ये उत्पादनवाढ, रोपांची गुणवत्ता, सिंचन व्यवस्थापन आणि हवामान बदलाशी जुळवून घेणाऱ्या तंत्रज्ञानावर सखोल चर्चा झाली. परिषदेत सहभागी अभ्यासकांनी जैन संशोधन प्रात्यक्षिक केंद्रातील ग्रीन हाऊस मातृवृक्ष, मोसंबी लागवड क्षेत्र, फळ प्रक्रिया उद्योग आणि क्लायमेट स्मार्ट टेक्नॉलॉजीचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक अनुभवले.
तांत्रिक सत्रांमध्ये विविध विषयांवर संशोधन पेपर्स सादर करण्यात आले. डॉ. येलेश कुमार यांनी उत्पादन वाढीसाठी रोपांच्या गुणवत्तेचे महत्त्व विशद केले, तर नागपूरचे डी. टी. मेश्राम यांनी पिकनिहाय पाण्याचे नियोजन, सेन्सर सिस्टीम, ऑटोमेशन आणि आधुनिक सिंचन पद्धतींचा पिकांच्या वाढीवर होणारा परिणाम उलगडून सांगितला. जैन इरिगेशनचे एम. एस. लधानिया यांनी रूट एअर प्रुनिंग आणि हवामान बदल तंत्रज्ञानावर सादरीकरण करत जैन स्वीट ऑरेंजच्या विविध वाणांची माहिती दिली.
जैवउत्तेजक, सूक्ष्मपोषक घटक, सेंद्रीय लागवड पद्धती, फांद्यांची शास्त्रीय छाटणी, मुळांच्या आकारात्मक पाण्याचे व्यवस्थापन आणि हायटेक ग्रीन हाऊस नर्सरीतील मायक्रोबडेड रोपे या विषयांवरही विविध तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. या सादरीकरणांमुळे शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाची व्यापक माहिती मिळाली.
उत्पादनवाढीचे खरे समाधान मातृवृक्षांमध्ये दडले असल्याचे मत इस्त्राईलचे शास्त्रज्ञ डॉ. अवी सडका यांनी मांडले. जागतिक स्तरावर नर्सरी कायदे कठोर होत असून, चुकीच्या ग्राफ्टिंगमुळे शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. बंदिस्त गृहात मातृवृक्षांपासून तयार झालेली, मातीविरहित माध्यमात वाढवलेली आणि प्रमाणित प्रयोगशाळांमध्ये तपासलेली रोपे ही भविष्यातील सुरक्षित शेतीची गुरुकिल्ली असल्याचे त्यांनी सांगितले.
परिषदेत सिट्रस पिकांवरील कीड व रोग व्यवस्थापनावर विशेष सत्र घेण्यात आले. ब्राझीलमध्ये गंभीर ठरत असलेल्या हुआंगलॉन्गबिंग (HLB) रोगावर अलेसिओ एस. मोरेरा यांनी माहिती दिली, तर भारतीय परिस्थितीत रोगमुक्त लागवड साहित्य निर्मिती, फळ पोखरणाऱ्या किडी, फायटोफ्थोरा बुरशीजन्य रोग आणि HLB रोगाची लक्षणे व उपाययोजना यावर देशातील तज्ज्ञांनी सखोल मांडणी केली. जैविक कीटकनाशके, ड्रोन इमेजिंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या साहाय्याने रोगांचे अचूक निदान यावरही आधुनिक संशोधन मांडण्यात आले.
या परिषदेत संपूर्ण भारतातील लिंबूवर्गीय फळांचे भव्य प्रदर्शन भरवण्यात आले होते. जैन इरिगेशनने विकसित केलेल्या ३४ वाणांसह देशातील ४४ प्रमुख वाणांचे सादरीकरण करण्यात आले. ‘जैन मॅडरिन-१’ आणि ‘जैन स्वीट ऑरेंज-६’ या नव्या वाणांनी अभ्यासकांचे विशेष लक्ष वेधले. तसेच संशोधन पोस्टर्सच्या माध्यमातून मोसंबीच्या सालीपासून तयार होणारी चटणी, किडीला कमी बळी पडणाऱ्या जाती आणि फळ प्रक्रियेतून मिळणाऱ्या उपउत्पादनांच्या वापरावर आधारित संशोधन अभ्यासकांसमोर मांडण्यात आले.
एकूणच ‘राष्ट्रीय सिट्रस सिम्पोजियम-२०२५’मुळे शेतकरी, संशोधक आणि उद्योग यांच्यातील दुवा अधिक भक्कम झाला असून, रोगमुक्त रोपे, आधुनिक तंत्रज्ञान आणि शास्त्रीय व्यवस्थापन यांच्या आधारे लिंबूवर्गीय फळ उत्पादनात नवा अध्याय सुरू होण्याची आशा निर्माण झाली आहे.



