जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील कुसुंबा शिवारात रविवारी रात्री एका भीषण अपघातात ५० वर्षीय प्रौढाचा दुर्दैवी मृत्यू झाला. जळगाव-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील कुसुंबा गावाजवळील प्राईम हॉटेलसमोर रस्ता ओलांडत असताना ही घटना घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी २१ डिसेंबर रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास एक ५० वर्षीय अनोळखी प्रौढ कुसुंबा शिवारातील प्राईम हॉटेलसमोरून रस्ता ओलांडत होते. त्याच वेळी छत्रपती संभाजीनगरकडून जळगावकडे अतिवेगाने येणाऱ्या एका कारने (क्र. एमएच १९ ईए १४१५) त्यांना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, संबंधित व्यक्ती गंभीर जखमी होऊन रस्त्यावर कोसळली.
उपचारापूर्वीच मृत्यू अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी तातडीने जखमी प्रौढाला उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही.
कार चालकाचे पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण विशेष म्हणजे, अपघातानंतर पळून न जाता कारचालक सुरेश गजानन पवार (वय ५९, रा. ओमनगर, जळगाव) हे स्वतःहून एमआयडीसी पोलीस ठाण्यात हजर झाले आणि घटनेची माहिती दिली. पोलिसांनी त्यांची कार ताब्यात घेतली असून, या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल भगवान चौधरी करीत आहेत.



