जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । देशाला क्रीडा क्षेत्रात जागतिक पातळीवर अग्रस्थानावर नेण्याच्या माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून प्रेरणा घेत ‘फिट युवा फॉर विकसित भारत’ या ब्रीदवाक्यासह रावेर लोकसभा मतदारसंघासाठी ‘खासदार क्रीडा महोत्सव २०२५’ या भव्य क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यामुळे भुसावळ शहरात क्रीडाप्रेमींचा उत्साह शिगेला पोहोचला असून, संपूर्ण मतदारसंघाचे लक्ष या स्पर्धांकडे लागले आहे.
हा भव्य उद्घाटन सोहळा केंद्रीय युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाच्या राज्यमंत्री तथा रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार मा. ना. श्रीमती रक्षा निखिल खडसे यांच्या संकल्पनेतून आणि प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे. या कार्यक्रमाला राज्य मंत्रिमंडळातील मंत्री, लोकप्रतिनिधी, क्रीडा क्षेत्रातील मान्यवर तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याने उद्घाटन सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
खासदार क्रीडा महोत्सव २०२५ अंतर्गत विविध क्रीडाप्रकारांच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून, यामध्ये फुटबॉल, कबड्डी, खो-खो यांसारख्या लोकप्रिय खेळांचा समावेश आहे. या महोत्सवात रावेर लोकसभा मतदारसंघातील शहरी व ग्रामीण भागातून एकूण पाच हजारांहून अधिक खेळाडू सहभागी होणार आहेत. युवकांमध्ये क्रीडाविषयक आवड निर्माण करणे, त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि तंदुरुस्त जीवनशैलीकडे प्रवृत्त करणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.
मंगळवार, दिनांक २३ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ३ वाजता जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथील सेंट्रल रेल्वे ग्राउंडवर या महोत्सवाचा उद्घाटन सोहळा होणार आहे. भव्य मैदान, हजारो खेळाडू, क्रीडाप्रेमी प्रेक्षक आणि मान्यवरांची उपस्थिती यामुळे भुसावळ शहर क्रीडामय वातावरणात रंगून जाणार आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील लपलेल्या क्रीडागुणांना चालना मिळेल, असा विश्वास आयोजकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
या महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रसारमाध्यमांचे योगदान महत्त्वाचे असून, वृत्तांकनासाठी वार्ताहर, प्रतिनिधी व छायाचित्रकारांनी कार्यक्रमस्थळी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या समन्वयासाठी श्री. विजय देशमुख यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
एकूणच, खासदार क्रीडा महोत्सव २०२५ हा केवळ स्पर्धांचा कार्यक्रम न राहता युवकांना फिटनेस, शिस्त आणि राष्ट्रीय विकासाशी जोडणारा प्रेरणादायी क्रीडामहोत्सव ठरणार असून, रावेर लोकसभा मतदारसंघाच्या क्रीडा चळवळीला नवी दिशा देणारा ठरेल.



