बोदवड-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शिरसाळा येथील मागासवर्गीय वस्तीमधून जाणाऱ्या रस्त्यावर सुरू असलेल्या मोरीच्या बांधकामाच्या दर्जावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, ग्रामपंचायत प्रशासनाच्या भूमिकेबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. यापूर्वीही दोन वेळा याच ठिकाणी मोरीचे बांधकाम करण्यात आले होते; मात्र निकृष्ट दर्जामुळे काही दिवसांतच ती कोसळली होती. असे असतानाही पुन्हा एकदा त्याच ठिकाणी बांधकाम सुरू करण्यात आले असून, याही वेळी कामाचा दर्जा अत्यंत सुमार असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
मोरीचे सध्या सुरू असलेले बांधकाम पाहता साहित्याची गुणवत्ता, कामाची पद्धत आणि नियोजन याबाबत गंभीर त्रुटी दिसून येत असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. मागासवर्गीय वस्तीतील गौतम साबळे, गणपत सूर्यवंशी व इतर नागरिकांनी हे काम कोणत्या निधीतून केले जात आहे, अशी विचारणा ग्रामसेवकांकडे केली असता कोणतीही ठोस माहिती देण्यात आली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. सार्वजनिक काम सुरू करताना आवश्यक असलेला कामाचा माहिती फलक लावण्यात आलेला नाही, तसेच बांधकाम सुरू असताना ये-जा करण्यासाठी पर्यायी साईड रस्त्याची व्यवस्था देखील करण्यात आलेली नाही.
या प्रकरणाबाबत आमच्या प्रतिनिधींनी ग्रामसेवकाशी दूरध्वनीवर संपर्क साधला असता, संबंधित मोरीचे काम सुमारे पाच लाख रुपयांचे असल्याचे सांगण्यात आले. मात्र हे काम कोणत्या ठेकेदाराला देण्यात आले आहे, निविदा कोणत्या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली, तसेच कामाच्या इस्टिमेटबाबत विचारणा केली असता “मला माहिती नाही” असे उत्तर देत ग्रामसेवकांनी अधिक माहिती देणे टाळले.
दरम्यान, मोरीच्या बांधकामादरम्यान सरपंच महोदयांची जेसीबी (MH19 CV 1277) मुरूम टाकताना दिसत असल्याने या कामामध्ये नेमके पाणी कुठे मुरते आहे, याबाबत नागरिकांमध्ये संशय आणि चर्चा सुरू झाली आहे. सार्वजनिक निधीतून होणाऱ्या कामात पारदर्शकतेचा अभाव दिसून येत असल्याने या प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने चौकशी करावी, अशी मागणी शिरसाळा येथील रहिवासी नाना सूर्यवंशी, गणपत सूर्यवंशी, कैलास सूर्यवंशी आणि गौतम साबळे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना केली आहे.
एकूणच, वारंवार निकृष्ट दर्जाचे बांधकाम, माहितीचा अभाव आणि नियमांचे उल्लंघन यामुळे शिरसाळा येथील या मोरीच्या कामाबाबत संशयाचे वातावरण निर्माण झाले असून, निष्पक्ष चौकशी झाल्यासच सत्य समोर येईल, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.



