Home आरोग्य नर्व्ह बायोप्सीमुळे ५५ वर्षीय रुग्णाला दिलासा ; महादेव रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया

नर्व्ह बायोप्सीमुळे ५५ वर्षीय रुग्णाला दिलासा ; महादेव रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया

0
112

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील आकाशवाणी चौक परिसरात असलेल्या महादेव हॉस्पिटलने न्यूरोलॉजी क्षेत्रात महत्त्वाची झेप घेतली असून, अत्याधुनिक “नर्व्ह बायोप्सी” शस्त्रक्रियेच्या माध्यमातून एका रुग्णाच्या आजाराचे अचूक निदान करण्यात यश मिळवले आहे. अनेक महिन्यांपासून मज्जातंतूंच्या दुर्मिळ विकाराने त्रस्त असलेल्या ५५ वर्षीय रुग्णाला या प्रक्रियेमुळे उपचाराची नवी दिशा मिळाली असून, रुग्णासाठी ही शस्त्रक्रिया खऱ्या अर्थाने आशेचा किरण ठरली आहे.

रमेशभाई (नाव बदललेले) या ५५ वर्षीय रुग्णाला गेल्या अनेक महिन्यांपासून हातपायांमध्ये सतत सुन्नपणा, जळजळ आणि अशक्तपणा जाणवत होता. या त्रासामुळे त्यांचे दैनंदिन जीवन अत्यंत कठीण झाले होते. विविध ठिकाणी तपासण्या करूनही आजाराचे नेमके कारण समजू शकत नसल्याने रुग्ण मानसिक तणावात होता. अखेर त्यांनी महादेव हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी धाव घेतली.

महादेव रुग्णालयाच्या न्यूरोलॉजी विभागाचे प्रमुख आणि तज्ज्ञ न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांनी रुग्णाची सखोल तपासणी करून मज्जातंतूंच्या दुर्मिळ विकाराचा संशय व्यक्त केला. अचूक निदानासाठी त्यांनी रुग्णालयातील पहिली अत्याधुनिक नर्व्ह बायोप्सी शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली. डॉ. तायडे यांच्या दीर्घ अनुभव, सूक्ष्म शस्त्रक्रियेमधील कौशल्य आणि अद्ययावत वैद्यकीय ज्ञानामुळे ही अतिशय नाजूक प्रक्रिया सुरक्षितपणे पूर्ण करण्यात आली.

नर्व्ह बायोप्सी ही मज्जातंतूंच्या विकारांचे निदान करण्यासाठी वापरली जाणारी अत्यंत विशेष आणि संवेदनशील प्रक्रिया आहे. यामध्ये मज्जातंतूचा अतिशय छोटा भाग काळजीपूर्वक काढून सूक्ष्मदर्शकाखाली तपासला जातो. इतर सर्व तपासण्या निष्फळ ठरल्यानंतर आजाराचे नेमके कारण शोधण्यासाठी ही प्रक्रिया केली जाते. यासाठी उच्च तांत्रिक कौशल्य, सूक्ष्म शस्त्रक्रियेचे ज्ञान आणि न्यूरोलॉजीचे सखोल आकलन आवश्यक असते.

या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर रुग्णाच्या आजाराचे अचूक निदान झाले असून, त्यानुसार योग्य आणि लक्ष्यित उपचार सुरू करण्यात आले आहेत. डॉ. कमलेश तायडे यांनी सांगितले की, ही यशस्वी नर्व्ह बायोप्सी महादेव हॉस्पिटलच्या न्यूरोलॉजी विभागासाठी मैलाचा दगड ठरणारी आहे. या सुविधेमुळे आता जळगाव आणि परिसरातील रुग्णांना गुंतागुंतीच्या व दुर्मिळ मज्जातंतू विकारांसाठी मोठ्या शहरांकडे जाण्याची गरज राहणार नाही.

महादेव हॉस्पिटलमध्ये उपलब्ध झालेल्या या अत्याधुनिक सुविधेमुळे रुग्णांना अचूक निदान, प्रभावी उपचार, वेळ व खर्चाची बचत आणि स्थानिक पातळीवर उच्च दर्जाच्या न्यूरोलॉजी सेवा मिळत आहेत. त्यामुळे जळगाव शहर वैद्यकीयदृष्ट्या अधिक सक्षम होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

उपचार घेणारे रमेशभाई यांनी समाधान व्यक्त करत सांगितले की, अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या त्रासामुळे ते पूर्णपणे हतबल झाले होते. विविध ठिकाणी उपचार करूनही निदान होत नव्हते, मात्र या नर्व्ह बायोप्सीमुळे आजाराचे खरे कारण समजले आणि योग्य उपचार मिळू लागले आहेत, याबद्दल त्यांनी डॉक्टरांचे आभार मानले.

महादेव रुग्णालयाच्या या कामगिरीमुळे जळगावात न्यूरोलॉजी उपचारांच्या क्षेत्रात नवे दालन खुले झाले असून, भविष्यात अनेक रुग्णांना याचा लाभ होणार आहे.


Protected Content

Play sound