यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांमध्ये एसटी बसस्थानकांच्या नव्या आणि आधुनिक इमारती उभारल्या गेल्या असताना, यावल बसस्थानक मात्र आजही शंभर वर्षांहून अधिक जुन्या आणि जीर्ण अवस्थेतील इमारतीतून कार्यरत आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर असतानाही नव्या बसस्थानकाच्या इमारतीचे बांधकाम प्रत्यक्षात मात्र रखडलेलेच आहे.

यावल बसस्थानकाची सध्याची इमारत अत्यंत जुनी असून, पावसाळ्यात गळती, तडे गेलेल्या भिंती, अपुरी बैठक व्यवस्था आणि मूलभूत सुविधांचा अभाव यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. जळगाव जिल्ह्यातील जवळपास सर्वच बसस्थानकांचे नूतनीकरण किंवा पुनर्बांधणी पूर्ण झाली असताना यावल बसस्थानकाकडे मात्र वर्षानुवर्षे दुर्लक्ष होत असल्याची भावना स्थानिक नागरिक आणि प्रवाशांमध्ये आहे.

विशेष म्हणजे यावल बसस्थानकाच्या नव्या इमारतीच्या बांधकामाला गेल्या सुमारे वीस वर्षांपूर्वीच तत्त्वतः मंजुरी मिळाल्याची माहिती समोर येत आहे. मात्र विविध कारणांमुळे हे काम प्रत्यक्षात सुरू होऊ शकलेले नाही. परिणामी दररोज हजारो प्रवाशांना जीर्ण इमारतीतून प्रवास करावा लागत असून, कोणत्याही क्षणी दुर्घटना होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या नव्या बसस्थानकाच्या इमारतीसाठी गेल्या वीस वर्षांपासून प्रवासी संघटनेचे यावल तालुका अध्यक्ष जगदीश कवडीवाले सातत्याने पाठपुरावा करत आहेत. वेळोवेळी निवेदने, आंदोलने आणि संबंधित अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करूनही अद्याप ठोस निर्णय झालेला नाही. लाईव्ह ट्रेंड्स न्यूजशी बोलताना जगदीश कवडीवाले यांनी यावल एसटी बस आगाराच्या दयनीय अवस्थेबाबत सविस्तर माहिती दिली आणि प्रशासनाच्या उदासीनतेवर नाराजी व्यक्त केली.
यावल हे तालुक्याचे महत्त्वाचे ठिकाण असून ग्रामीण भागातील प्रवाशांसाठी एसटी बससेवा हा प्रमुख दळणवळणाचा आधार आहे. त्यामुळे आधुनिक, सुरक्षित आणि सुविधायुक्त बसस्थानक उभारणे ही काळाची गरज असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त होत आहे. नव्या इमारतीमुळे प्रवाशांना सुविधा मिळण्यासोबतच शहराच्या विकासालाही चालना मिळणार आहे.
एकीकडे जिल्ह्यात विकासकामांचा गाजावाजा होत असताना, यावल बसस्थानकाच्या बाबतीत मात्र केवळ आश्वासनांवरच समाधान मानावे लागत असल्याचे चित्र आहे. आता तरी संबंधित विभागाने ठोस पावले उचलून नव्या बसस्थानकाच्या इमारतीचे काम तातडीने सुरू करावे, अशी जोरदार मागणी प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
एकूणच शंभर वर्षांहून अधिक जुन्या यावल बसस्थानकाच्या नव्या इमारतीसाठीचा संघर्ष अजूनही सुरू असून, लवकरात लवकर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल का, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.



