
जळगाव-जितेंद्र कोतवाल | जलसंपदा मंत्री ना. गिरीशभाऊ महाजन यांचे कट्टर समर्थक तथा जिल्हा दुध संघाचे संचालक अरविंद देशमुख हे जळगाव महापालिकेच्या निवडणुकीत उतरणार असून त्यांची उमेदवारी यंदाच्या निवडणुकीत लक्षवेधी ठरणार असल्याचे मानले जात आहे.

जिल्हा दुध संघाचे संचालक तथा भाजपचे पदाधिकारी अरविंद देशमुख हे ना. गिरीशभाऊ महाजन यांचे निकटवर्तीय असून अचूक रणनितीकार म्हणून त्यांची ओळख आहे. आपल्या नेत्याने दिलेले प्रत्येक ‘टास्क’ पूर्ण करणे ही त्यांची खासियत मानली जाते. यात विशेष करून गत विधानसभा निवडणुकीत त्यांनी रावेर विधानसभा मतदारसंघात केलेले प्रयत्न हे सर्वांना ज्ञात आहेत. तर जिल्हा दुध संघातही त्यांची कार्यकुशलता दिसून आली आहे. तर जिल्हा कृषी औद्योगिक सहकारी संस्थेत ते उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. तर आरोग्यदूत म्हणून त्यांनी हजारो रुग्णांना मदत केली आहे. या पार्श्वभूमिवर, अरविंद देशमुख हे जळगाव महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
अरविंद देशमुख हे पिंप्राळा शिवारात असलेल्या पाळधी रोडवरील सुकृती अपार्टमेंटमधील रहिवासी आहेत. त्यांनी गेल्या अनेक महिन्यांपासून या भागात चाचपणी करून आणि नागरिकांशी सल्लामसलत करून प्रभाग क्रमांक आठमधून लढण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच प्रभाग क्रमांक नऊ, दहा अथवा पंधरा येथून देखील ते लढू शकतात. या अनुषंगाने त्यांची कधीपासूनच तयारी देखील सुरू आहे. त्यांनी पक्षाकडे यासाठी उमेदवारी देखील मागितली आहे. सर्वात लक्षणीय बाब म्हणजे सूत्रांच्या माहितीनुसार जलसंपदा मंत्री ना. गिरीशभाऊ महाजन यांनी त्यांना होकार दिला असून तयारीला लागण्याचे निर्देश दिले आहेत. अरविंद देशमुख यांनी पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली असून त्यांना ती मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. असे झाल्यास ना. गिरीशभाऊ महाजन आणि आ. राजूमामा भोळे यांना महापालिकेत एक तडफदार सहकारी मिळणार असल्याचे देखील राजकीय जाणकारांचे मत आहे.
दरम्यान, या संदर्भात लाईव्ह ट्रेंडस न्यूजने अरविंद देशमुख यांची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता ते म्हणाले की, होय मी महापालिका उमेदवारीसाठी इच्छुक आहे. तथापि, पक्षाने आदेश दिला तर मी या निवडणुकीच्या रिंगणात उतरून नक्की बाजी मारणार असे देशमुख यांनी नमूद केले.
अरविंद देशमुख हे कधीपासूनच महापालिकेच्या राजकारणात पडद्याआड सक्रीय असून मध्यंतरी पक्षातून फुटलेल्या नगरसेवकांना पुन्हा भाजपमध्ये आणण्यात त्यांचे महत्वाचे योगदान असल्याचे दिसून आले आहे. यामुळे त्यांची संभाव्य उमेदवारी ही जळगाव महापालिका निवडणुकीत लक्षवेधी ठरण्याची शक्यता आहे.



