जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जळगाव शहरातील प्रेमनगर ते पिंप्राळा रोड दरम्यान असलेल्या एका पेट्रोलपंपाजवळ गौणखनिज वाळूची अवैध वाहतूक करताना जिल्हापेठ पोलिसांनी ट्रॅक्टरसह ट्रॉली आणि वाळू असा एकूण ४ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिलेल्या माहितीनुसार, १३ डिसेंबर रोजी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास पोलिसांनी प्रेमनगर ते पिंप्राळा रोडवरील पेट्रोलपंपाजवळ तपासणी केली. त्यावेळी एका अज्ञात आरोपीच्या ताब्यात असलेले ट्रॅक्टर (क्र. MH १९ BG ४५७८) आणि विना क्रमांकाची ट्रॉली यामध्ये गौणखनिज वाळू (अंदाजे २ ब्रास) अवैध रित्या भरलेली आढळून आली. शासनाची कोणतीही परवानगी न घेता ही वाळू चोरून तिची वाहतूक करत असल्याचे स्पष्ट झाले.

पोलिसांनी तातडीने अवैध वाळूसह ट्रॅक्टर आणि ट्रॉली असा एकूण ४ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा तपास पोना रुस्तम तडवी हे करत आहे.



