Home Cities जळगाव जळगाव महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले ; भाजप इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती १५ डिसेंबरपासून

जळगाव महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले ; भाजप इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती १५ डिसेंबरपासून

0
167


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीचे बिगुल वाजण्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने संघटनात्मक पातळीवर तयारीला वेग दिला असून, इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींचा शुभारंभ सोमवार, दिनांक १५ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजल्यापासून करण्यात येणार आहे. इतर राजकीय पक्षांच्या तुलनेत भाजपने निवडणूक तयारीत आघाडी घेतल्याचे चित्र असून या प्रक्रियेमुळे उमेदवार निवडीला अधिक पारदर्शक आणि शिस्तबद्ध स्वरूप देण्यात येणार आहे.

या मुलाखती भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा कार्यालयात, जी. एम. फाउंडेशन, जळगाव येथे होणार असून महाराष्ट्र राज्याचे ज्येष्ठ भाजप नेते तथा जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीशभाऊ महाजन, जिल्हा निवडणूक प्रभारी व वस्त्रोद्योग मंत्री संजयजी सावकारे, जळगाव लोकसभा खासदार श्रीमती स्मिताताई वाघ, महानगरपालिका निवडणूक प्रमुख आमदार सुरेश (राजुमामा) भोळे, तसेच जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष श्री. दिपक सुर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत.

भाजपने या मुलाखती मंडल व प्रभागनिहाय घेण्याचा निर्णय घेतला असून त्यानुसार वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. मंडल क्रमांक ०१ अंतर्गत प्रभाग क्रमांक १, २, ३ आणि ४ साठी सकाळी ११ वाजता मुलाखती होतील. मंडल क्रमांक ०२ अंतर्गत प्रभाग क्रमांक ५, ६, ७ आणि १५ साठी दुपारी १२ वाजता मुलाखती घेतल्या जातील. मंडल क्रमांक ०३ अंतर्गत प्रभाग क्रमांक ११, १२ आणि १३ साठी दुपारी २ वाजता मुलाखती होणार आहेत.

यानंतर मंडल क्रमांक ०४ अंतर्गत प्रभाग क्रमांक १४, १६, १७, १८ आणि १९ साठी दुपारी ३ वाजता, तर मंडल क्रमांक ०५ अंतर्गत प्रभाग क्रमांक ८, ९ आणि १० साठी दुपारी ४ वाजता मुलाखती घेतल्या जाणार आहेत. सर्व इच्छुक उमेदवारांनी त्यांना दिलेल्या वेळेनुसार अचूक उपस्थित राहावे, असे स्पष्ट निर्देश भाजपकडून देण्यात आले आहेत.

सर्व मुलाखती केवळ सोमवार, दिनांक १५ डिसेंबर २०२५ रोजी आणि जाहीर केलेल्या वेळेतच पार पडणार असून या संदर्भात कोणताही बदल होणार नसल्याची माहिती भाजप जिल्हा सरचिटणीस तथा जिल्हा संयोजक विशाल त्रिपाठी आणि नितीन इंगळे सहसंयोजक, जळगाव शहर महानगरपालिका निवडणूक यांनी दिली आहे. या प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती जाहीर करण्यात आल्याचे भाजप जिल्हा प्रसिद्धी प्रमुख मनोज भांडारकर यांनी स्पष्ट केले.

या मुलाखती प्रक्रियेमुळे जळगाव महापालिका निवडणुकीसाठी भाजपची उमेदवार निवड अंतिम टप्प्यात जाणार असून शहराच्या विकासासाठी सक्षम आणि कार्यक्षम नेतृत्व पुढे आणण्याचा पक्षाचा निर्धार यातून दिसून येतो.


Protected Content

Play sound