
मुंबई-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण आणि थेट भूमिका मांडत राजकीय चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे. मुंबई महापालिकेत महायुती म्हणून निवडणूक लढवण्याच्या निर्णयावर भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याच्या चर्चांवर बोलताना फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत आपली भूमिका मांडली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कार्यकर्त्यांमध्ये फार मोठ्या प्रमाणावर नाराजी आहे, असे मला वाटत नाही. प्रत्येक कार्यकर्त्याला जास्तीत जास्त संधी मिळावी, अशी अपेक्षा असते, हे स्वाभाविक आहे. मात्र, सर्वात महत्त्वाचे उद्दिष्ट म्हणजे मुंबई महानगरपालिकेवर महायुतीचा झेंडा फडकवणे आणि मुंबईत विकासाभिमुख व पारदर्शक प्रशासन आणणे. त्यासाठीच महायुतीचा निर्णय घेण्यात आला असून हा निर्णय मुंबईकरांच्या हिताचा आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या संदर्भात सुरू असलेल्या चर्चांवरही देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका मांडली. भाजपामुळे शिंदे गट नाराज असल्याच्या चर्चांना उत्तर देताना त्यांनी स्पष्ट केले की, भाजप फक्त ५५ जागांची मागणी करेल, असे म्हणणे चुकीचे आहे. अद्याप कोणतीही अधिकृत जागावाटपाची मागणी करण्यात आलेली नाही. मागील निवडणुकीत कल्याण-डोंबिवलीत भाजपच्या ४२ जागा आल्या होत्या, त्यामुळे तिथे भाजप हा प्रमुख पक्ष आहे. त्या महापालिकेत शिवसेना आणि भाजप हे दोनच प्रमुख पक्ष असून तिसऱ्या पक्षाचे अस्तित्व फारसे नाही. त्यामुळे आपसात चर्चा करून योग्य तो जागावाटपाचा निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या एका विधानावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अनेकदा अजित पवार काही मुद्द्यांवर भाष्य करतात आणि त्याचा वेगळा अर्थ काढला जातो. मात्र, मूळात सुरू केलेली योजना ही हुशार, होतकरू विद्यार्थ्यांसाठी आहे, जे पीएचडीसाठीचा खर्च करू शकत नाहीत. जर एका घरातील पाच जणांनीच योजनेचा लाभ घेतला, तर इतर गरीब आणि गरजू कुटुंबांतील विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे अजित पवार यांनी व्यक्त केलेली चिंता योग्यच आहे, असेही फडणवीस यांनी नमूद केले.
या सर्व चर्चांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “निवडणुका जिंकणे हाच आमचा फॉर्म्युला आहे,” असे ठामपणे सांगत महायुतीच्या रणनीतीवर शिक्कामोर्तब केले. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत महायुतीमुळे नाराजी असल्याच्या चर्चांना उत्तर देत त्यांनी स्पष्ट केले की, अंतिम ध्येय विकास, स्थिर प्रशासन आणि जनतेचा विश्वास जिंकणे हेच आहे.
एकूणच, महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांच्या या थेट विधानामुळे महायुतीची भूमिका स्पष्ट झाली असून राजकीय वर्तुळातील चर्चांना नवे वळण मिळाले आहे.



