सावदा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघेल असा दिव्य आणि ऐतिहासिक सोहळा सावदा शहरात आयोजित करण्यात आला असून जगद्गुरु रामानंदाचार्य दक्षिण पीठ नाणीजधामचे पीठाधीश्वर श्री. रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या सिद्ध पादुकांचा भव्य दर्शन सोहळा सोमवार, दिनांक १५ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ९ वाजता सावदा–फैजपूर बायपास रोडवरील शासकीय विश्रामगृहासमोर संपन्न होणार आहे. या सोहळ्यासाठी जळगाव जिल्ह्यासह परिसरातील हजारो भाविक उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे.
या पवित्र कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ढोल-ताशांच्या गजरात, टाळ-मृदुंगाच्या मंगलमय नादात होणार असून कलशधारी महिला, निशानदारी पुरुष, लेझीम पथके आणि विविध सजीव देखाव्यांसह जगद्गुरुंच्या सिद्ध पादुकांची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. मिरवणुकीनंतर संतपीठावर विधिवत पूजन, स्वागत, आरती व मंत्रघोषात सिद्ध पादुकांची पूजा संपन्न होणार असून संपूर्ण परिसर अध्यात्मिक वातावरणाने भारावून जाणार आहे.

सिद्ध पादुका पूजन हे सद्गुरूंप्रती श्रद्धा, निष्ठा आणि सन्मान व्यक्त करण्याचे एक अत्यंत महत्त्वाचे माध्यम मानले जाते. वेदमंत्रांच्या उच्चारामुळे वातावरण पवित्र होणार असून भाविकांना जगद्गुरुंच्या सिद्ध पादुकांचे दर्शन घेऊन त्यांच्या कृपा व आशीर्वादाचा लाभ घेण्याची अलौकिक संधी मिळणार आहे. याच कार्यक्रमात विशेष अध्यात्मिक प्रवचनाचे आयोजन करण्यात आले असून भाविकांसाठी उपासक दीक्षा व गुरूपूजनही संपन्न होणार आहे. उपासक दीक्षा घेऊ इच्छिणाऱ्या भाविकांनी मोठ्या संख्येने नोंदणी करावी, असे आवाहन रामानंद संप्रदाय जळगाव जिल्हा सेवा समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
या दर्शन सोहळ्यादरम्यान जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या समाजोपयोगी कार्यांचाही परिचय करून दिला जाणार आहे. संस्थानतर्फे ‘दुर्बल घटक पुनर्वसन’ योजनेअंतर्गत गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. यासोबतच देहदान व अवयवदान जनजागृती, ग्रामस्वच्छता अभियान, मोफत इंग्रजी माध्यमांच्या शाळा, मोफत वेदपाठ शाळा, मोफत दवाखाने, कायदेविषयक साक्षरता शिबिरे तसेच महिला सक्षमीकरणासाठी मोफत शिलाई यंत्र व घरघंटी वाटप यांसारखे अनेक उपक्रम संस्थान राबवत आहे.
वैद्यकीय सेवेतही संस्थानचे कार्य उल्लेखनीय असून महाराष्ट्रातील विविध महामार्गांवर ५३ रुग्णवाहिका २४ तास अपघातग्रस्तांच्या सेवेत कार्यरत आहेत. जानेवारी २०२५ मध्ये आयोजित रक्तदान शिबिरांमधून तब्बल १ लाख ३६ हजार २७० रक्तकुपिकांचे संकलन करण्यात आले असून ही बाब संस्थानच्या सामाजिक बांधिलकीचे प्रतीक मानली जात आहे.
जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या कृपेचा व आशीर्वादाचा लाभ घेण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील तसेच परिसरातील सर्व भाविकांनी सहकुटुंब, सहपरिवार आणि आप्तेष्टांसह मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे कळकळीचे आवाहन रामानंद संप्रदाय जळगाव जिल्हा सेवा समितीच्या वतीने करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या दिवशी सर्व भाविकांसाठी महाप्रसादाची भव्य व्यवस्था करण्यात आली असून हा सोहळा भक्ती, सेवा आणि संस्कारांचा संगम ठरणार आहे.



