जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जळगावमध्ये ‘रंजल्या-गांजल्यांची सेवा’ या सामाजिक भावनेतून उपक्रम राबविण्यात आला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांना ब्लँकेट व फराळ वाटप करण्यात आले. याप्रसंगी पक्षाचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात पक्षाच्या अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. पक्षाचे महानगराध्यक्ष एजाज मलिक, सामाजिक न्याय उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रमेश बारे, महिला महानगर अध्यक्ष मंगलाताई पाटील, जिल्हा समन्वयक विकास पवार, कार्याध्यक्ष राजेंद्र चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष दीपक मराठी, अशोक लाडवंजारी, राजू मोरे यांच्यासह आसिफ पठाण, पप्पू जकातदार, संजय पाटील आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राज्यभरातील आणि जिल्ह्यातील अनेक गोरगरीब रुग्ण उपचारासाठी जीएमसीमध्ये येत असतात. रुग्णासोबत थांबणाऱ्या त्यांच्या नातेवाईकांना अनेकदा थंडीत किंवा बाहेरच्या वातावरणात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. ही गरज ओळखून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ब्लँकेट आणि फराळ वाटप करून माणुसकीचा वसा जपला. हा उपक्रम केवळ वाढदिवस साजरा करण्याचा नसून, समाजातील गरजू घटकांना आधार देण्याच्या पक्षाच्या धोरणाचे प्रतीक असल्याचे यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी सांगितले.



