मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । मुंबई ते थेट नाशिकपर्यंत लोकल ट्रेन सुरू होण्याचे स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार आहे. रेल्वे बोर्डाने मुंबई-नाशिक मार्गावरील बहुप्रतिक्षित प्रकल्पातील मोठा तांत्रिक अडथळा दूर करत मनमाड आणि कसारा दरम्यान १३१ किमीच्या दोन नव्या रेल्वे लाइन्सला मंजुरी दिली आहे. यामुळे मुंबई उपनगरीय लोकल सेवेचा विस्तार नाशिकपर्यंत करणे शक्य होणार आहे.

हा प्रकल्प सह्याद्रीच्या दुर्गम डोंगररांगातून जात असल्यामुळे, या मार्गावर वाहतूक वेगवान आणि सहज करण्यासाठी तब्बल १८ बोगदे बांधावे लागणार आहेत. सध्या या मार्गावर लांब पल्ल्याच्या गाड्यांना घाट सेक्शनमध्ये ‘बँकर’ इंजिनाची मदत घ्यावी लागते. मात्र, नवीन मार्गिकांमुळे हा ताण कमी होऊन वाहतूक अधिक गतिमान होईल.

मध्य रेल्वेने या प्रकल्पासाठी ‘मिशन मोड’वर काम सुरू केले आहे. जमीन अधिग्रहणाचे नोटीफिकेशन जारी झाले असून, अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्याच्या व्यस्त रेल्वे मार्गावरील ताण कमी करण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे. विशेषतः मालवाहतुकीसाठी स्वतंत्र मार्गिका उपलब्ध झाल्याने, गर्दीच्या वेळेतही प्रवासी वाहतुकीला गती मिळेल.
मुंबई उपनगरीय लोकलमध्ये देशातील सर्वाधिक प्रवासी प्रवास करतात. या नवीन विस्तारामुळे मध्य रेल्वेला अधिक लोकल फेऱ्या चालवता येतील, ज्यामुळे लाखो प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबई-नाशिक-मनमाड मार्गावर नियमित लोकल सेवा सुरू होईल. यामुळे प्रवासाचा वेळ वाचेल आणि इंधनाचीही बचत होईल. तसेच, उत्तर महाराष्ट्र आणि मुंबई दरम्यान एक मजबूत ट्रान्सपोर्ट लिंक तयार होऊन, औद्योगिक विकास आणि मालवाहतुकीची कनेक्टिव्हिटी लक्षणीयरीत्या वाढेल. या कामाला पुढील वर्षापर्यंत गती मिळण्याची शक्यता आहे.



