एरंडोल–लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । आरोग्य विमा कंपन्यांकडून दावे नाकारले जाण्याच्या वाढत्या घटनांमध्ये एरंडोल येथील डॉ. गीतांजली ठाकूर यांनी दिलेला न्यायासाठीचा लढा सर्वसामान्य नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. केअर हेल्थ विमा कंपनीने आरोग्य विमा दावा नाकारल्यानंतर तब्बल दीड वर्ष लांबलेल्या या संघर्षात विमा लोकपाल पुणे यांच्या आदेशाने अखेर सर्व दावे मंजूर झाले आहेत. यामुळे विमा संरक्षण मिळवताना ग्राहकांना येणाऱ्या अडचणीवर पुन्हा एकदा प्रकाश पडला आहे.
डॉ. गीतांजली ठाकूर या केअर हेल्थ विमा कंपनीच्या वर्षानुवर्षांच्या नियमित ग्राहक. नोव्हेंबर 2021 मध्ये त्यांना दुर्धर आजाराचे निदान झाले. उपचारासाठी प्रचंड खर्च अपेक्षित असल्याने त्यांनी कंपनीकडून कॅशलेस सुविधा मागितली; मात्र जळगाव येथील स्थानिक कार्यालयाने विविध अडथळे निर्माण करत ही सुविधा अचानक नाकारली. परिस्थिती गंभीर असल्याने ठाकूर कुटुंबीयांनी मुंबईतील रुग्णालयात स्वतःची मोठी रक्कम भरून शस्त्रक्रिया केली आणि उपचारांनंतर सर्व कागदपत्रांसह विमा दावे दाखल केले. परंतु कंपनीने पुन्हा एकदा टाळाटाळ करत हे दावेही नाकारले.

कंपनीने दावा नाकारण्यामागचे कारण देताना डॉ. ठाकूर यांनी आरोग्यविषयक वस्तुस्थिती ‘लपवली’ असल्याचा आरोप केला. एवढेच नव्हे, तर भविष्यात कोणत्याही प्रकारचे विमा संरक्षण मिळणार नाही, अशी धमकीही देण्यात आल्याचे ठाकूर कुटुंबीयांनी सांगितले. दरम्यान, किमोथेरपी, रेडिओथेरपी आणि इतर उपचारांसाठी एकूण नऊ दावे कंपनीकडे पाठविण्यात आले, परंतु जळगाव कार्यालयाकडून सर्व दावे एकाच कारणावर फेटाळले जात राहिले.
या अन्यायाविरुद्ध न्याय मिळवण्यासाठी ठाकूर कुटुंबीयांनी जून 2022 मध्ये पुणे येथील माननीय विमा लोकपाल कार्यालयाचा दरवाजा ठोठावला. वर्षभराच्या प्रक्रियेनंतर 23 जून 2023 रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सुनावणी झाली. आजारपणाच्या अवस्थेतही स्वतः उपस्थित राहून डॉ. ठाकूर यांनी आपली बाजू मांडली. सर्व पुरावे तपासल्यानंतर 26 जून 2023 रोजी लोकपालांनी प्राथमिक दावे मंजूर करण्याचा आदेश कंपनीस दिला. यानुसार काहीच दिवसांत तीन दाव्यांची रक्कम त्यांच्या खात्यात जमा झाली.
मात्र बाकीचे सहा दावे मंजूर करणे टाळत कंपनीने पुन्हा एकदा टाळाटाळ सुरू केली. वारंवार करण्यात आलेल्या पत्रव्यवहारालाही उत्तर न मिळाल्याने मानसिक त्रास वाढत गेला. त्यामुळे डॉ. ठाकूर यांनी पुन्हा एकदा 27 मे 2024 रोजी विमा लोकपालांकडे PUN-H-037-2425-1643 या क्रमांकाने तक्रार दाखल केली. 15 ऑक्टोबर 2024 रोजी हा दावा स्वीकारला गेला. प्रत्येक दाव्यासाठी स्वतंत्र सुनावणी घेणे अन्यायकारक ठरेल, अशी विनंती लोकपालांसमोर मांडताच त्यांनी सहानुभूतीपूर्वक यावर विचार केला.
विमा लोकपालांनी संवेदनशीलतेने सर्व माहिती तपासून उर्वरित दावे कुठल्याही पुढील सुनावणीशिवाय मंजूर करण्याचे निर्देश केअर हेल्थ कंपनीस दिले. अखेर 4 डिसेंबर 2025 रोजी शेवटचा दावा देखील पूर्ण रकमेचा डॉ. ठाकूर यांच्या खात्यात जमा झाला आणि त्यांच्या संघर्षाला न्याय मिळाला.
डॉ. गीतांजली ठाकूर यांचा हा संघर्ष सर्वसामान्य ग्राहकांसाठी दिशा दाखवणारा आहे. आरोग्य विमा दावा नाकारल्यानंतर नागरिकांनी काय करावे, कुठे दाद मागावी याबाबतची माहिती नसल्याने अनेक जण आर्थिक अडचणीत सापडतात. अशा परिस्थितीत त्यांनी दिलेला लढा आणि मिळवलेले यश हे आरोग्य विमा क्षेत्रातील मनमानीला चपराक ठरल्याचे प्रतिक्रिया मिळत आहेत.



