Home Uncategorized डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजची सानिका कोकणे आणि युगल धुर्वे राज्य विद्यापीठ...

डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजची सानिका कोकणे आणि युगल धुर्वे राज्य विद्यापीठ संघात चमकले


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील दोन तरुण बास्केटबॉल खेळाडूंनी राज्यस्तरावर महाविद्यालयाचा झेंडा अभिमानाने फडकवला आहे. सानिका कोकणे आणि युगल धुर्वे यांनी महाराष्ट्र राज्य आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या (MUHS) संघात स्थान मिळवत राज्य आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धेत उज्वल कामगिरी नोंदवली.

नाशिक येथे पार पडलेल्या क्षेत्रीय निवड चाचणीत दोघेही नाशिक विभागीय संघात निवडले गेले. त्यानंतर कोल्हापूर येथे झालेल्या आंतरक्षेत्रीय स्पर्धेत मुलींच्या संघाने विजेतेपद मिळवत प्रभावी कामगिरी केली, तर मुलांच्या संघाने उपांत्य फेरीपर्यंत मजल मारत दमदार प्रदर्शन केले. या कामगिरीच्या जोरावर सानिका आणि युगल यांची महाराष्ट्र राज्य आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या अधिकृत संघात निवड झाली.

४ ते ८ डिसेंबरदरम्यान नांदेड येथे झालेल्या राज्य आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सवात सानिका कोकणे (मुलींचा संघ) आणि युगल धुर्वे (मुलांचा संघ) यांनी अपूर्व कौशल्याचे प्रदर्शन केले. दोघांच्या योगदानामुळे त्यांच्या संघांनी तीनही सामने जिंकण्याची किमया केली आणि तब्बल २७ वर्षांनंतर प्रथमच या संघांनी उपांत्यपूर्व फेरी गाठली.

उपांत्यपूर्व फेरीत मुलींच्या संघाने विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला, तर मुलांच्या संघाला कडवी स्पर्धा देऊनही पराभव स्वीकारावा लागला. युगल धुर्वेच्या एकूण ३० बास्केट्स आणि सानिका कोकणेच्या २२ बास्केट्समुळे त्यांच्या संघांचे स्थान भक्कम झाले. मुलींच्या संघाने २४ संघांमधून चौथ्या क्रमांकावर झेप घेतली, तर मुलांनी पाचव्या स्थानावर आपली छाप उमटवली.

दोघांच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे भविष्यात राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर संधी मिळण्याचे दालन आता खुले झाले आहे. या खेळाडूंना प्रशिक्षक सुरेंद्र गावंडे यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्य डॉ. केतकीताई पाटील, डॉ. वैभव पाटील, डॉ. अनिकेत पाटील, डॉ. अक्षता पाटील, अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके आणि प्रशासन अधिकारी प्रमोद भिरूड यांनी अभिनंदन व्यक्त केले आहे.


Protected Content

Play sound