
पारोळा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । समाजकार्यातील अपार योगदान आणि श्रमिकांना आयुष्यभर न्याय मिळवून देण्यासाठी झटणारा लढवय्या नाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्व. डॉ. बाबासाहेब आढाव यांच्या स्मृतीला पारोळा कृषी उत्पन्न बाजार समितीत भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. हमाल मापाडी कामगारांच्या हक्कांसाठी आयुष्यभर संघर्ष करणाऱ्या या थोर समाजसेवकांच्या आठवणीने परिसरात भावनिक वातावरण निर्माण झाले.

पारोळा तालुका हमाल मापाडी संघटना आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात कामगार बांधव, बाजार समितीचे पदाधिकारी आणि स्थानिक प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रमिकांच्या कल्याणासाठी आयुष्य वाहिलेल्या डॉ. आढाव यांच्या प्रेरणादायी कार्याचा गौरव करत उपस्थित मान्यवरांनी त्यांना अभिवादन केले.
जनसेवक पी. जी. पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, स्व. डॉ. बाबासाहेब आढाव यांचे कार्य महान असून त्यांनी गरीब, उपेक्षित आणि असंघटित कामगारांना संघटित करण्यासाठी आयुष्यभर झटले. कामगारांच्या न्यायासाठी त्यांनी वेळोवेळी संघर्ष उभारला आणि हमाल मापाडी बांधवांना सन्मानाने जगता यावे यासाठी अथक प्रयत्न केले. कृषी उत्पन्न बाजार समितीत हमाल बांधवांचा एक संचालक असावा ही मागणी शासनाकडे पाठपुरावा करून पूर्ण करवून घेण्याचे मोठे काम त्यांनी केले, हेही त्यांनी गौरवले.
वयाच्या 96 व्या वर्षापर्यंत कामगार बांधवांच्या उन्नतीसाठी झटणाऱ्या या थोर समाजसेवकांना अखेरचा दंडवत प्रणाम करत उपस्थितांनी त्यांच्या कार्याला सलाम केला. कार्यक्रमाला बाजार समितीचे अध्यक्ष भरत खाडे, सचिव दीपक पाटील, उपाध्यक्ष सुरेश पाटील, संचालक राजू मराठे, गुलाब मराठे, उखा मराठे, केशव शेटे, रामकृष्ण पाटील, गोलू पाटील, ईश्वर पाटील, शंकरराव अवचिते, युवराज अवचिते, बंडू हमाल, राजू चौधरी, आबा भोसले, भरत पाटील, ईश्वर चौधरी, राजू पाटील, भगवान नाईक, बापू भोसले, दगा मैराळे, बळीराम हमाल तसेच कर्मचारी सचिन पाटील, निलेश राजपूत, नामदेव पाटील यांसह अनेक कामगार बांधवांनी उपस्थिती दर्शवली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केशव शेटे यांनी केले.



