
जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरात मोकाट कुत्र्यांची वाढलेली दहशत पुन्हा एकदा समोर आली आहे. सोमवारी ८ डिसेंबर रोजी पहाटे ५ वाजता आसोदा रोडवर मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या एका प्रौढ व्यक्तीवर भटकी कुत्र्यांच्या टोळक्याने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे जळगाव महानगरपालिकेच्या भोंगळ कारभारावर नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कांचन नगर भागात राहणारे शिवनारायण सोनवणे हे नेहमीप्रमाणे सोमवारी पहाटे आपल्या सहकाऱ्यांसोबत आसोदा रोडवर शतपावली करण्यासाठी गेले होते. याच वेळी, अचानक त्यांच्यावर पिसाळलेल्या मोकाट कुत्र्यांनी हल्ला चढवला. कुत्र्यांनी सोनवणे यांच्या हाताला आणि पायाला चावा घेऊन त्यांना जबर दुखापत केली.
स्थानिकांनी तात्काळ धाव घेऊन त्यांना कुत्र्यांच्या तावडीतून सोडवले आणि तातडीने उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे दाखल केले. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
जळगाव शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असूनही महापालिका प्रशासन त्यांचे निर्बीजीकरण करण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. याच दुर्लक्षामुळे अशा घटना वारंवार घडत आहेत. महापालिका प्रशासनाने नागरिकांच्या सुरक्षेकडे लक्ष देऊन, त्वरित मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी आता जोर धरू लागली आहे.



