
यावल –लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील आदिवासी पालकांनी आपल्या चिमुकल्या मुलांना नामांकित इंग्रजी माध्यम शाळांत प्रवेश मिळावा, या मागणीसाठी सुरू केलेले अन्नत्याग आंदोलन दुसऱ्या दिवशीही तीव्र होत आहे. शिक्षणाच्या हक्कासाठी ठाम भूमिका घेतलेल्या पालकांच्या या लढ्याला स्थानिक तसेच राज्य पातळीवरील सामाजिक संघटनांचा मोठा पाठींबा मिळू लागला आहे.

यावल येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या माध्यमातून आदिवासी विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यम शाळांमध्ये प्रवेश दिला जाण्याची प्रक्रिया अर्धवट राहिल्याने अनेक विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात आले आहे. प्रवेशप्रक्रिया थांबली असल्याने मुलांना नामांकित शाळांत प्रवेशच मिळत नसल्याचा पालकांचा आरोप आहे. त्यामुळे आपल्या मुलांना दर्जेदार इंग्रजी शिक्षणाचा हक्क मिळावा यासाठी आदिवासी पालकांनी थंडीतच प्रकल्प कार्यालयासमोर अन्नत्याग आमरण उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनात लहान मुले आणि बालकांनीही उपस्थिती दाखवत परिस्थितीची गंभीरता अधोरेखित केली आहे.
या संघर्षाला आदिवासी तडवी भिल्ल एकता मंचचे महाराष्ट्र राज्याध्यक्ष एम. बी. तडवी यांनी प्रत्यक्ष येऊन पाठींबा दिला. सायसिंग केशव बारेला, मुनाफ जुम्मा तडवी, रबील तडवी, मानिष तडवी यांसह अनेकांनी आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांना साथ देत शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी केली आहे.
अन्नत्याग आंदोलन सुरळीत पार पडावे व आंदोलकांना आवश्यक मदत मिळावी यासाठी विविध संस्था व स्थानिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला आहे. ज्योती विद्यामंदिरचे शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, भुसावळ पतपेढीचे सचिव चेतन तळले, घ. का. विद्यालय आमोदया येथील अजित पाटील, ललित सुपे, न्यू इंग्लिश स्कूल भालोदचे प्राचार्य डी. व्ही. चौधरी, अ. ध. चौधरी विद्यालय कठोरा, प्राचार्य नितीन झांबरे, यावल पतपेढीचे अध्यक्ष किरण झांबरे, तसेच आदर्श विद्यालय दहिगावचे गणेश महाजन यांनी आंदोलनस्थळी भेट देत आवश्यक सहकार्य केले.



