Home क्राईम महावितरणचा पुन्हा गलथान कारभार; तुटलेल्या विद्युत तारेमुळे तरुण गंभीर जखमी

महावितरणचा पुन्हा गलथान कारभार; तुटलेल्या विद्युत तारेमुळे तरुण गंभीर जखमी


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महावितरणच्या कामातील हलगर्जीपणा आणि निष्काळजीपणामुळे एक तरुण गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना जळगाव शहरातील मेहरुण परिसरात घडली आहे. सोमवारी ८ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता मेहरूण येथील अशोक किराणाजवळील चौकात दुरुस्ती केलेले काम आटोपल्यानंतर अवघ्या काही वेळातच मुख्य विद्युत वाहिनी अचानक तुटली. नेमक्या याच वेळी रस्त्यावरून जात असलेले उमर शेख सलीम (वय २५, रा. दत्तनगर, मेहरुण) या तरुणाला या तुटलेल्या वाहिनीचा जोरदार धक्का बसला. या जीवघेण्या घटनेत उमर गंभीररित्या भाजला असून, त्याच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

महावितरणचा पुन्हा गलथान कारभार
मेहरुण परिसरातील अशोक किराणा चौकात महावितरणकडून मुख्य विद्युत वाहिनी दुरुस्तीचे काम करण्यात आले होते. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, हे काम अतिशय घाईगडबडीत आणि निकृष्ट दर्जाचे झाले होते. काम संपल्यानंतर लगेचच वाहिनी तुटल्याने, महावितरणच्या कामाच्या गुणवत्तेवर आणि सुरक्षेच्या उपाययोजनांवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

जीव वाचवण्यासाठी नागरिकांची धावपळ
विद्युत वाहिनी तुटल्यानंतर झालेल्या स्फोटासारख्या आवाजाने परिसरात एकच गोंधळ उडाला. उमरला विजेचा धक्का बसून तो जमिनीवर कोसळल्याचे पाहताच, परिसरातील नागरिकांनी तत्काळ मदत कार्य सुरू केले. नागरिकांच्या समयसूचकतेमुळे त्याला तात्काळ तेथून जवळच असलेल्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, विजेच्या धक्क्यामुळे उमरच्या शरीराचा काही भाग गंभीर भाजला असून, सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे.

महावितरणच्या या गलथान कारभारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. नागरिकांनी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या घटनेची तात्काळ दखल घेऊन, जखमी तरुणाला आर्थिक मदत करावी आणि दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.


Protected Content

Play sound