धरणगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । ऐन कडाक्याच्या थंडीत धरणगाव तालुक्यातील चावलखेडे येथील विधवा भगिनी शोभाबाई दिलीप अहिरे यांच्यावर मोठे संकट कोसळले आहे. बेघर वस्तीतील त्यांच्या झोपडीला अचानक आग लागल्याने त्यांचा संपूर्ण संसार उघड्यावर आला आहे. दोन दिवसांपूर्वी दुपारी ही घटना घडली.

गेल्या ३० ते ४० वर्षांपासून पार्टिशनच्या कच्च्या झोपडीत राहणाऱ्या शोभाबाई अहिरे यांच्या घरातील संसारोपयोगी साहित्य आणि कष्टाने जमवलेले रोख ५० हजार रुपये या आगीत जळून खाक झाले आहेत. त्यांना बचत गटातून ७० हजार रुपयांचे कर्ज मिळाले होते, त्यातील २० हजार रुपये खर्च झाले होते आणि उर्वरित ५० हजार रुपये घरात ठेवलेले होते, जे जळून गेले.

शोभाबाई या तरुण वयात विधवा झाल्या असून, त्यांना मुलबाळ नाही. त्या मोलमजुरी करून आपली गुजराण करतात. त्यांची परिस्थिती अत्यंत बिकट असून, त्यांना घरकुल मंजूर असतानाही, ग्रामपंचायत हद्दीत जागा नसल्याने ते तीन वेळा नामंजूर झाले आहे.
पी. सी. आबा पाटील यांनी ही माहिती कळवल्यानंतर, रोटरी क्लब जळगावचे अध्यक्ष गिरीष कुलकर्णी सर यांना याबाबत कळवण्यात आले आहे. त्यांना तातडीने मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या संकटाच्या काळात समाजातील दानशूर व्यक्तींनी शोभाबाईंना मदत करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.



