जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पद्मविभूषण श्री रतन टाटा यांना समर्पित असलेल्या ‘नाट्य रतन’ कला आणि नाट्य महोत्सव २०२५ साठी जळगावमधील परिवर्तन जळगाव या नाट्यसंस्थेच्या ‘पालखी’ या नाटकाची निवड करण्यात आली आहे.
मुंबईत यशवंत नाट्यमंदिर (माटुंगा) येथे २५ ते २८ डिसेंबर या कालावधीत हा चार दिवसीय राष्ट्रीय नाट्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. परिवर्तन जळगावच्या शंभू पाटील लिखित आणि दिग्दर्शित ‘पालखी’ हे दोन अंकी मराठी नाटक या महोत्सवात २६ डिसेंबर रोजी सादर होणार आहे.

देशभरातील विविध १२ भाषिक नाटकांची या प्रतिष्ठित महोत्सवासाठी निवड करण्यात आली आहे. यामध्ये मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेतील नाटकांचा समावेश आहे. एका छोट्या शहरातील नाट्यकृतीला राष्ट्रीय महोत्सवात स्थान मिळणे, हे जळगावच्या नाट्य चळवळीसाठी मोठे यश आहे.
वारकरी परंपरेचा शोध घेणारे ‘पालखी’ ‘पालखी’ हे नाटक मराठी संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेल्या वारकरी परंपरेचा सखोल शोध घेते. महाराष्ट्रातील सामाजिक वास्तव, मानवी समूहाच्या विविध भावभावना आणि भिन्न दृष्टिकोन ३५ कलावंतांच्या सोबतीने रंगमंचावर साकारत हे नाटक प्रेक्षकांना अनेक स्तरांवर अंतर्मुख करते. महोत्सवात सादर होणारा हा ‘पालखी’ नाटकाचा पाचवा प्रयोग असेल. यापूर्वी जामनेर, अमळनेर, बऱ्हाणपूर आणि जळगाव येथे नाटकाचे यशस्वी प्रयोग झाले आहेत.
या महोत्सवात ‘पालखी’ सोबतच मकरंद देशपांडे यांचे ‘मद्यापी’, ‘इन्स्पेक्टर पवार परत मेला’, ‘महादेव’, तसेच पुणे येथील ‘जॉयराइड’, ग्वाल्हेर येथील ‘कनुप्रिया’, ‘इथेच टाका तंबू’, ‘श्याम’, ‘पॉपकॉर्न’, लखनऊ येथील ‘आखिरी वसंत’ आणि ‘कर्ण’ आदी नाटकांची निवड करण्यात आली आहे.
परिवर्तन नाट्यसंस्थेच्या या यशाबद्दल अशोक जैन, प्रा. डी. डी. बच्छाव, छबीराज राणे, अनिल कांकरिया, अनिश शहा, अमर कुकरेजा, डॉ. रेखा महाजन, नंदलाल गादीया, नंदकुमार अडवाणी, डॉ. सोनाली महाजन यांसह अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.



