बुलढाणा–शेगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शेगाव येथील श्री संत गजानन महाराजांच्या समाधीचे दर्शन हे श्रद्धास्थान मानले जाते. देशभरातून भाविक येथे मोठ्या संख्येने येत असतात. साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या पत्नी सौ. दमयंती राजेसाहेब भोसले यांनी शनिवारी शेगाव श्रींच्या समाधीचे दर्शन घेतले. या भेटीदरम्यान त्यांच्याकडून व्यक्त झालेला आनंद आणि समाधानी भावना परिसरात चर्चेचा विषय ठरली.

दर्शनानंतर सौ. दमयंती राजेसाहेब भोसले यांनी श्री संस्थांच्या विविध उपक्रमांची माहिती जाणून घेतली. संस्थेच्या वतीने उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या सोयी-सुविधा, परिसरातील स्वच्छता, सेवेकऱ्यांची नम्रता आणि शिस्तबद्ध व्यवस्था पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. त्यांनी सांगितले की, या सर्व बाबींमुळे देशभरात शेगाव श्रींची आगळी वेगळी ओळख निर्माण झाली आहे.

सौ. दमयंती राजेसाहेब भोसले या खासदार उदयनराजे भोसले यांच्या पत्नी असून विविध धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग सदैव उल्लेखनीय राहिला आहे. शेगाव श्रींच्या समाधी परिसरातील अध्यात्मिक वातावरणाने त्यांना ‘अत्यंत प्रसन्न’ वाटल्याची नोंदही त्यांनी यावेळी बोलताना केली.
समाधीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी रजत नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या खामगाव शहरालाही भेट दिली. येथे रजत मार्केटमध्ये त्यांनी विविध चांदीच्या वस्तूंची माहिती घेतली. खामगावच्या चांदीवर आधारित पारंपरिक कारागिरीबद्दल त्यांना विशेष रस वाटल्याचे स्थानिक व्यापाऱ्यांनी सांगितले.
दिवसभराचा धार्मिक आणि सांस्कृतिक प्रवास दमयंती राजेसाहेब भोसले यांच्यासाठी अविस्मरणीय ठरला. शेगावची अध्यात्मिकता आणि खामगावची ऐतिहासिक रजत परंपरा त्यांनी जवळून अनुभवली.



