Home क्रीडा राज्य क्रीडा महोत्सव 2025 मध्ये मुक्ताईनगरच्या शुभम मुलांडेची निवड

राज्य क्रीडा महोत्सव 2025 मध्ये मुक्ताईनगरच्या शुभम मुलांडेची निवड


मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्रातील आगामी क्रीडाशक्ती घडवणाऱ्या युवा खेळाडूंमध्ये मुक्ताईनगरचा शुभम हरिश्चंद्र मुलांडे याचे नाव विशेषत्वाने घेतले जात आहे. महाराष्ट्र राज्य क्रीडा महोत्सव 2025 आंतर विद्यापीठ क्रीडा स्पर्धेसाठी त्याची निवड झाली असून, ही मुक्ताईनगर व महाविद्यालयासाठी मोठी गौरवाची बाब ठरली आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या पुरुष मैदानी क्रीडा संघात समावेश होणारा शुभम हा श्रीमती जी. जी. खडसे महाविद्यालयाचा प्रथम वर्ष विज्ञान शाखेतील विद्यार्थी आहे.

“२७वा महाराष्ट्र राज्य क्रीडा महोत्सव २०२५” येत्या ४ ते ८ डिसेंबर २०२५ दरम्यान स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथे आयोजित करण्यात आला आहे. खो-खो, कबड्डी, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, मैदानी स्पर्धा, टेबल टेनिस, बॅडमिंटन आणि बुद्धिबळ अशा विविध क्रीडा प्रकारांचा यात समावेश असून राज्यातील सर्व आंतर विद्यापीठ संघ या स्पर्धेत उतरतील. या सर्व प्रकारातील खेळाडूंचा संयुक्त सराव ३० नोव्हेंबर ते २ डिसेंबरदरम्यान क.ब.चौ.उ.म.वि. जळगाव येथे पार पडला. त्यानंतर ३ डिसेंबर रोजी सर्व संघ स्पर्धेच्या ठिकाणी रवाना झाले.

शुभम मुलांडे याची विशेषतः 1500 मीटर आणि 5000 मीटर धावण्याच्या स्पर्धेसाठी निवड झाली असून, त्याची कामगिरी, जिद्द आणि सातत्य लक्षात घेता ही निवड अपेक्षित असल्याचे क्रीडा तज्ज्ञांचे मत आहे. प्रा. डॉ. प्रतिभा ढाके यांच्या मार्गदर्शनाखाली शुभमने केलेल्या मेहनतीचे फळ त्याला या महत्त्वाच्या स्पर्धेत मिळाले आहे.

या उपलब्धीनंतर मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा अॅड. रोहिणी ताई खडसे-खेवलकर, उपाध्यक्ष नारायण दादा चौधरी, सचिव डॉ. सी. एस. दादा चौधरी, सर्व व्यवस्थापन सदस्य, प्राचार्य प्रा. डॉ. एच. ए. महाजन, उपप्राचार्य डॉ. संजीव साळवे, उपप्राचार्या डॉ. वंदना चौधरी, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच महाविद्यालयातील सर्व खेळाडूंनी शुभमचे अभिनंदन करून पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. स्थानिक पातळीपासून राज्यस्तरापर्यंत अशी प्रगती करीत असलेल्या शुभमकडून स्पर्धेत उत्तम कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


Protected Content

Play sound