Home Cities जळगाव हार-फुलांपेक्षा शिक्षणाला साथ: महापरिनिर्वाण दिनानिमित्त जळगावात ‘एक वही एक पेन’ उपक्रमाला प्रतिसादाची...

हार-फुलांपेक्षा शिक्षणाला साथ: महापरिनिर्वाण दिनानिमित्त जळगावात ‘एक वही एक पेन’ उपक्रमाला प्रतिसादाची अपेक्षा


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जळगाव शहरात यंदा एक वेगळाच सामाजिक संदेश दिला जात आहे. ६ डिसेंबर २०२५ रोजी रेल्वे स्टेशन परिसरातील बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करताना हार-फुले न आणता विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य अर्पण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंच संचलित ‘एक वही एक पेन संकलन समिती’ने हे सामाजिक अभियान मागील १२ वर्षांपासून सातत्याने राबवून लाखो विद्यार्थ्यांना शैक्षणिक बळ पुरवले आहे.

जळगाव रेल्वे स्टेशन परिसरात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भीम अनुयायांची मोठी गर्दी अपेक्षित आहे. बाबासाहेबांच्या विचारांचा खरा सन्मान म्हणजे शिक्षणाच्या माध्यमातून समाज परिवर्तनाची दिशा देणे; याच संकल्पनेतून फुलहार, मेणबत्त्या वा अगरबत्त्यांऐवजी वही, पेन, रजिस्टर, पाटी किंवा वाचनीय पुस्तके आणण्याचे आवाहन समितीने केले आहे. “हार नको, शिक्षणाला बळ द्या!” हा संदेश देत समितीने या दिवसाला अधिक अर्थपूर्ण बनवण्याचा प्रयत्न केला आहे.

संकलित केलेले साहित्य समितीच्या स्टॉलवर जमा केले जाईल आणि ते गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले जाईल. बाबासाहेबांच्या “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” या विचारांना कृतीत उतरवण्यासाठी हा उपक्रम प्रभावी माध्यम ठरत असल्याचे आयोजकांनी सांगितले. समाजाचा शैक्षणिक उत्थान हाच खरा अभिवादनाचा मार्ग असल्याचा संदेश विचार मंचतर्फे देण्यात आला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळ्यासमोर, जळगाव रेल्वे स्टेशनजवळ उभारण्यात आलेला संकलन स्टॉल सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत कार्यरत असेल. या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद देऊन विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हातभार लावावा, असे आवाहन समितीचे मोरे सर, बडगे सर, सपकाळे सर, सुरवाडे सर, यशवंते सर, मौर्य सर, इंगळे सर, नन्नवरे सर आणि सोनवणे सर यांनी संयुक्तपणे केले आहे.

अभिवादनाच्या पारंपरिक पद्धतीत बदल घडवून सामाजिक जबाबदारीची जाणीव वाढवणारा हा उपक्रम जळगावकरांच्या सहभागाने अधिक परिणामकारक ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


Protected Content

Play sound