जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी: खान्देशाची अस्मिता आणि मराठी साहित्यातील महान कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या ७४ व्या स्मृतीदिनानिमित्त जळगाव शहरातील चौधरी वाड्यात मंगळवारी, २ डिसेंबर रोजी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बहिणाबाईंच्या साहित्यातील साधेपणा, तत्त्वज्ञान आणि ग्रामीण जीवनाचे मार्मिक चित्रण याची आठवण यानिमित्ताने मान्यवरांनी आणि उपस्थित नागरिकांनी जागवली.
या कार्यक्रमाला हभप श्रीराम महाराज, कवयित्री आणि अभ्यासक प्रा. डॉ. संध्या महाजन आणि लेखक डॉ. रमेश माने यांची प्रमुख उपस्थिती लाभली. मान्यवरांनी आपल्या भाषणांतून बहिणाबाई चौधरी यांच्या अलौकिक प्रतिभेला वंदन केले. प्रा. डॉ. संध्या महाजन यांनी बहिणाबाईंच्या कवितांचा जीवनानुभव आणि त्यातील तत्त्वज्ञान आजच्या पिढीसाठी किती महत्त्वाचे आहे, हे स्पष्ट केले. तर डॉ. रमेश माने यांनी बहिणाबाईंच्या साहित्याचा खान्देशातील बोलीभाषेवर आणि लोकसंस्कृतीवर पडलेला प्रभाव विशद केला. हभप श्रीराम महाराजांनी बहिणाबाईंच्या कवितेतील अध्यात्मिक पैलू आणि परमेश्वराचे दर्शन यावर मार्गदर्शन केले.

स्मृतीदिनाच्या या कार्यक्रमात काशीबाई उखाजी कोल्हा शाळेतील विद्यार्थिनींनी सहभाग घेऊन बहिणाबाईंना अनोखे अभिवादन केले. या विद्यार्थिनींनी बहिणाबाईंच्या प्रसिद्ध कवितांचे सादरीकरण केले. यामध्ये खुशी अरविंद बारी या विद्यार्थीनीने साक्षात कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची वेशभूषा साकारून उपस्थितांचे लक्ष वेधले. तसेच, तेजल चंद्रशेखर वाघ, पल्लवी विकास शिरसाठ आणि भूमिका राजेश जंगले या विद्यार्थिनींनी आपल्या दमदार आवाजात बहिणाबाईंच्या निवडक कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
या संपूर्ण कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्ञानेश्वर शेंडे यांनी केले. प्रभावी आणि ओघवते सूत्रसंचालन गिरीश कुलकर्णी यांनी केले, तर उपस्थितांचे आभार किशोर कुळकर्णी यांनी व्यक्त केले.
बहिणाबाई चौधरींच्या स्मृतींना उजाळा देणाऱ्या या कार्यक्रमामुळे जळगावातील साहित्यिक आणि सांस्कृतिक वातावरण पुन्हा एकदा भारून गेले. या निमित्ताने, ‘अरे संसार संसार, जसा तवा चुल्ह्यावर’ अशा अजरामर ओळी देणाऱ्या या महान कवयित्रीच्या कार्याची महती नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न यशस्वी झाला.



