नाशिक-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । नाशिकमध्ये आगामी कुंभमेला 2027 च्या तयारीला वेग आला असताना तपोवन परिसरातील प्रस्तावित वृक्षतोडीचा मुद्दा मोठा वाद बनला आहे. साधुग्राम उभारणीसाठी महापालिकेने तब्बल १७०० झाडे तोडण्याची, पुनर्रोपणाची किंवा फांद्यांची छाटणी करण्याची नोटीस दिल्यानंतर पर्यावरणप्रेमी, स्थानिक नागरिक आणि अनेक कलावंतांकडून तीव्र विरोध सुरू आहे. या वाढत्या आंदोलनाला आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही पाठिंबा दिल्याने प्रकरणाला राज्यस्तरीय गांभीर्य प्राप्त झाले आहे.
महापालिकेच्या नोटिशीनंतर तपोवनातील पर्यावरणीय समतोल बिघडण्याची भीती व्यक्त करत अनेकांनी सोशल मीडियावर आणि प्रत्यक्ष आंदोलनाच्या माध्यमातून निषेध नोंदवला. अभिनेत्यांपैकी सयाजी शिंदे यांनी तर तपोवन परिसराला भेट देत महापालिकेवर थेट टीका केली. ‘एक झाड तोडून दहा झाडे लावू’ अशा विधानांवर त्यांनी संताप व्यक्त करत, “जुनी झाडे तोडणे म्हणजे शहराचा श्वास घोटणे आहे. आम्ही एक झाड वाचवण्यासाठी १०० माणसं उभी करू, पण ते झाड तोडू देणार नाही,” असे ठाम मत व्यक्त केले होते.

यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या ‘एक्स’ पोस्टद्वारे सयाजी शिंदे यांच्या भूमिकेला उघडपणे समर्थन दिले. त्यांनी म्हटले, “तपोवनातील वृक्षतोडीच्या संदर्भात समोपचाराने तोडगा काढला पाहिजे. सयाजी शिंदे यांनी घेतलेली भूमिका पर्यावरण हिताची आहे. विकासाबरोबर पर्यावरणाचा समतोल राखणे ही काळाची गरज आहे. पर्यावरण वाचले तरच पुढची पिढी सुरक्षित राहील, हे आपण सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे.” त्यांच्या या भूमिकेमुळे वृक्षतोडीविरोधातील आंदोलनाला नवी ऊर्जा मिळाली आहे.
तपोवन परिसरातील झाडे अनेक दशकांपासून या परिसराचे पर्यावरण, जैवविविधता आणि तापमान संतुलन टिकवण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. कुंभमाळ्यासाठी साधुग्राम उभारणे आवश्यक असले तरी, पर्यावरणाचा प्रश्न समोर आल्याने पर्यायी मार्ग शोधण्याची मागणी अधिक तीव्र झाली आहे. महापालिकेच्या निर्णयाला राजकीय आणि सामाजिक स्तरावरून वाढता विरोध पाहता, प्रशासनावर नव्याने दबाव निर्माण होत आहे.
सयाजी शिंदे यांनी केलेल्या कठोर विधानांमुळे जनतेत जागृती वाढली असून अनेक पर्यावरण संघटनांनी महापालिकेने दिलेल्या झाडतोड नोटिशीचा आढावा घेऊन ती मागे घ्यावी, अशी मागणी केली आहे. आता उपमुख्यमंत्र्यांच्या समर्थनामुळे या प्रश्नाचे लवकरच पुनर्मूल्यांकन होण्याची चिन्हे दिसत आहेत.



