Home क्रीडा वैभव सूर्यवंशी ठरला टी-20 सामन्यांत तीन शतके झळकावणारा जगातील सर्वात तरुण खेळाडू

वैभव सूर्यवंशी ठरला टी-20 सामन्यांत तीन शतके झळकावणारा जगातील सर्वात तरुण खेळाडू


कोलकाता-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025 मध्ये सलग तीन सामन्यांत अपयशी ठरल्यामुळे टीकेच्या केंद्रस्थानी आलेला बिहारचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी चौथ्या सामन्यात अक्षरशः तुफान कोसळला. महाराष्ट्राविरुद्ध मैदानात उतरताच वैभवने चौफेर फटकेबाजी करत केवळ टीकेला उत्तर दिलं नाही, तर इतिहासातही आपलं नाव कोरलं. वयाच्या अवघ्या 14 व्या वर्षी त्याने झळकावलेलं हे धडाकेबाज शतक क्रिकेटविश्वाला दिपवणारं ठरलं.

महाराष्ट्राविरुद्धच्या या सामन्यात बिहारने प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत 3 गडी गमावून 176 धावा उभारल्या. या धावसंख्येत उपकर्णधार वैभव सूर्यवंशीचा नाबाद 108 धावांचा मोठा वाटा होता. ओपनर म्हणून उतरलेल्या वैभवने 61 चेंडूत तडाखेबाज खेळी साकारली. त्यात 7 षटकार आणि 7 चौकारांचा समावेश असून त्याचा स्ट्राइक रेट तब्बल 177 पेक्षा अधिक होता. सुरुवातीला बिपिन सौरभ आणि नंतर पीयूष यांच्यासोबतची भागीदारी मोठी नसल्यानं दबाव वाढला, मात्र तिसऱ्या विकेटसाठी आकाश राजसोबत केलेली अर्धशतकी भागीदारी टीमला स्थैर्य देणारी ठरली.

आकाश राज 14व्या षटकात बाद झाल्यानंतर बिहारचा स्कोर 3 बाद 101 होता. त्यानंतर वैभवने गती कायम ठेवत प्रथम अर्धशतक आणि त्याच लयीत षटकाराच्या सहाय्याने शतक पूर्ण केले. पहिल्या तीन सामन्यांत मिळून फक्त 32 धावा करणाऱ्या वैभवने महाराष्ट्राविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात तुफानी शतक झळकावत दमदार पुनरागमन केले. विशेष म्हणजे, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीतलं हे त्याच्या कारकिर्दीतील पहिलंच शतक ठरलं.

केवळ 14 वर्षांचा असलेला वैभव सूर्यवंशी टी-20 क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करत असून आता फक्त 17 टी-20 सामन्यांत तीन शतके झळकावणारा जगातील सर्वात तरुण खेळाडू बनला आहे. इतक्या कमी वयात अशी अद्वितीय कामगिरी करणारा तो पहिलाच क्रिकेटपटू ठरला आहे. तीन अपयशी सामन्यांनंतर अशा दमदार खेळीने त्याने केवळ संघाचे मनोबल उंचावले नाही, तर आगामी सामन्यांसाठीही स्वतःकडून मोठी अपेक्षा निर्माण केली आहे.


Protected Content

Play sound