जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील बोरनार गावात बसविण्यात आलेल्या महत्त्वाकांक्षी सौर ऊर्जा प्रकल्पावर चोरट्यांनी मध्यरात्री डल्ला मारल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. चोरट्यांनी तब्बल २५०० मीटर लांबीची डीसी केबल चोरून नेली असून, यात प्रकल्पाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही चोरीची घटना २३ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री ११.३० वाजेनंतर घडली. बोरनार गावात कार्यान्वयीत असलेल्या या सौर ऊर्जा प्रकल्पातून चोरट्यांनी सौर प्लेटला जोडलेली ₹१ लाख २० हजार रुपये किमतीची २५०० मीटर लांबीची डीसी केबल कापून चोरून नेली. एवढेच नव्हे तर, चोरट्यांनी सौर प्लेटला जोडलेले अनेक जंक्शन बॉक्स तोडून प्रकल्पाचे मोठे नुकसान केले आहे.

ही चोरीची बाब दुसऱ्या दिवशी, २४ नोव्हेंबर रोजी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेनंतर सुशील सुनील पाटील (वय २६, रा. लोणी, ता. जामनेर, ह. मु. प्रेमनगर) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. सुशील पाटील यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. पोहेकॉ ईश्वर लोखंडे हे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.



