मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचार तापलेल्या वातावरणात राजकीय बयानबाजीला जोर चढला आहे. शिवसेना (शिंदे गट) यांच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आणि आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कन्या संजना चंद्रकांत पाटील यांनी आज खडसे परिवारावर थेट टीका करत “खडसेंचं आव्हान नाही, त्यांचं जे काही होतं ते 2019 मध्येच संपलं,” असे विधान करून राजकीय चर्चेला उधाण आणले.
संजना पाटील यांनी सांगितले की जळगाव जिल्ह्यापासून उत्तर महाराष्ट्रातील राजकारणात मुक्ताईनगर नगरपंचायत निवडणुकीला अनावश्यकपणे मोठे स्वरूप देण्यात आले आहे. “ही निवडणूक चुकीच्या पद्धतीने फार मोठी केली गेली आहे. मी स्वतःहून राजकारणात येणार नव्हते, पण जनतेच्या आग्रहास्तव मला या निवडणुकीत उतरावे लागले,” असे त्यांनी स्पष्ट केले.

महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी खडसे परिवाराच्या आरोपांना प्रतिउत्तर दिले. “जर मुक्ताईनगरमध्ये मुली आणि महिला असुरक्षित असत्या, तर रस्त्यावर फिरणेही अशक्य झाले असते. आम्हाला असे अजिबात वाटत नाही की मुक्ताईनगरमध्ये महिलांची सुरक्षितता धोक्यात आहे. आमच्या शहरात महिलांना सुरक्षित वातावरण आहे,” असे संजना पाटील यांनी सांगितले.
संजना पाटील यांनी खडसे परिवाराला थेट लक्ष्य करत त्यांच्या राजकीय प्रभावावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “खडसेंचं जे काही होतं ते 2019 मध्ये संपलं. आता जनता नवीन नेतृत्वाकडे पाहत आहे,” असे तीव्र शब्दांत त्यांनी म्हटले. त्यांच्या या भूमिकेमुळे मुक्ताईनगरच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली असून निवडणुकीचा रंग अधिक गडद झाला आहे.



