भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भुसावळ नगरपरिषद निवडणुकीत महायुतीकडून लोकनियुक्त नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीस असलेल्या भाजप नेत्या सौ. रजनी संजय सावकारे यांच्या प्रचार दौऱ्यास शहरातील नागरिक आणि महिलांनी मोठ्या उत्साहात प्रतिसाद दिला आहे. शनिवारी घेण्यात आलेल्या व्यापक दौऱ्यादरम्यान प्रभागांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
शनिवारी सकाळच्या सत्रात प्रभाग क्रमांक ६ आणि २५ मध्ये घेण्यात आलेल्या प्रचार दौऱ्याची सुरुवात विश्वकर्मा मंदिर, गवळी वाडा येथून झाली. रजनी ताई सावकारे आणि माजी मंत्री संजयजी सावकारे यांनी नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधत आगामी काळातील विकासाची दिशा आणि महायुतीचा व्यापक दृष्टिकोन मांडला. स्थानिक प्रश्न, सोयी-सुविधा आणि सामाजिक बांधिलकी यांचा उल्लेख करत रजनी सावकारे यांनी नागरिकांचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न केला. “आपण मला संधी दिल्यास सर्व प्रलंबित प्रश्न निश्चित सोडवू,” असे आश्वासन त्यांनी यावेळी मतदारांना दिले.

प्रभागातील मतदारांनीही प्रचारादरम्यान उत्कट सहभाग नोंदवत महायुतीच्या उमेदवारांविषयी उत्साह व्यक्त केला. महिलांचा प्रतिसाद विशेष उल्लेखनीय ठरला असून त्यांनी वाढत्या संख्येने प्रचार मिरवणुकीत सहभाग दर्शवला. स्थानिक पातळीवर विकासाचे प्रश्न, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते या विषयांवर नागरिकांनी सावकारे दाम्पत्यासमोर मांडणी केली. त्यावर लक्ष देण्याची ग्वाही उमेदवारांनी दिली.
दुपारच्या सत्रात प्रभाग क्रमांक २४ मध्ये झालेल्या प्रचार दौऱ्यादरम्यान रजनी सावकारे यांनी घरोगरी भेट देत मतदारांच्या अडचणी जाणून घेतल्या. या सत्रातही नागरिकांचा उत्साह कायम दिसून आला. स्थानिकांशी संवाद साधताना विकासकामांसाठी आवश्यक असलेली सातत्यपूर्ण बांधिलकी महायुती जपेल, असे त्यांनी नमूद केले.
प्रचार मिरवणुकीदरम्यान भाजप-महायुतीचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने महिला-पुरुष समर्थक उपस्थित होते. शेकडो मतदारांच्या स्वयंस्फूर्तीने झालेल्या सहभागामुळे रजनी सावकारे यांच्या प्रचार मोहीमेला अधिक वेग मिळाल्याचे जाणवत होते.



