भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आगामी भुसावळ नगर परिषदेच्या लोकनियुक्त नगर अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजप युतीच्या उमेदवार रजनीताई संजय सावकारे यांच्या बाजूने अत्यंत महत्त्वाचा आणि निर्णायक कौल मिळाला आहे. भुसावळ शहरातील सकल नाभिक समाजाने एकमुखी निर्णय घेत रजनीताई सावकारे यांना जाहीर पाठिंबा दर्शविला असून, त्यांना विक्रमी मतांनी विजयी करण्याचा संकल्प केला आहे. या पाठिंब्यामुळे भाजपच्या उमेदवाराची बाजू निवडणुकीत अधिक भक्कम झाली आहे.
या संदर्भात नाभिक संघ, भुसावळ शहर यांच्या वतीने निवेदन प्रसिद्ध करण्यात आले. या निवेदनानुसार, मंत्री ना.संजयभाऊ सावकारे यांनी नाभिक समाजाच्या सामाजिक विकासासाठी सातत्याने भरीव योगदान दिले आहे. विशेषतः, समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या श्री संत सेना महाराज सामाजिक सभागृह विकसित करण्याच्या कामात नामदार सावकारे यांनी कायम भक्कम साथ दिली आहे. तसेच, समाजातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी नियमितपणे शिष्यवृत्ती देऊन त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला हातभार लावला आहे.

माजी मंत्री संजय सावकारे यांच्या याच विधायक आणि सामाजिक बांधिलकीमुळे सकल नाभिक समाज त्यांच्यासोबत एक दिलाने उभा राहिला आहे. समाजाच्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांनी आणि बांधवांनी एकत्र येत, भाजपच्या नगरअध्यक्ष पदाच्या उमेदवार रजनीताई संजय सावकारे यांना आपला जाहीर व सक्रिय पाठिंबा देत असल्याचे स्पष्ट केले आहे.
नाभिक समाजाच्या सर्व मतदारांनी सौ. रजनीताई संजय सावकारे यांना मोठ्या मताधिक्क्याने निवडून आणण्याचा निर्धार केला असून, या पाठिंब्यामुळे भुसावळच्या निवडणुकीतील समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत. समाजाच्या या एकमुखी निर्णयाने निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या प्रचार यंत्रणेला मोठे बळ मिळाले आहे.



