Home Cities यावल यावलमध्ये भाजपा उमेदवाराला अपक्ष उमेदवाराचा पाठींबा

यावलमध्ये भाजपा उमेदवाराला अपक्ष उमेदवाराचा पाठींबा

0
157

यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल नगरपालिकेच्या दोन डिसेंबर २०२५ रोजी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचत असताना प्रभाग क्रमांक २अ मधील राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या या प्रभागात अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल करणारे संतोष राम ठाकूर यांनी निवडणुकीच्या काही दिवसांवरच रिंगणातून माघार घेत BJP उमेदवार रूबाब महमंद तडवी यांना जाहीर पाठींबा देत राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलून टाकली आहेत.

यावल नगरपालिकेतील प्रमुख राजकीय नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या प्रचारसभेत ठाकूर यांनी आपला निर्णय जाहीर केला. जलसंपदामंत्री ना. गिरीषमहाजन यांच्या सभेत त्यांनी अधिकृतपणे रूबाब तडवी यांच्या समर्थनाची घोषणा केली. सभेमध्ये ठाकूर यांच्या निर्णयाचे भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्वागत केले, तर मंत्री महाजन यांनीही त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. ठाकूर यांनी पाठींबा जाहीर करताना प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी सक्षम नेतृत्व म्हणून रूबाब तडवी यांच्यावर विश्वास व्यक्त केला.

प्रभाग २अ मधील अनुसूचित जमातीच्या मतदारसंघात तडवी यांना मिळालेल्या या बिनशर्त पाठींब्यामुळे त्यांच्या विजयाची वाट अधिक सुकर झाल्याची भावना स्थानिक कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे. आदिवासी मतदारसंघात संतोष ठाकूर यांचा स्वतःचा प्रभाव असल्याने त्यांच्या माघारीमुळे भाजपा उमेदवाराला थेट फायदा होणार असल्याचे जाणकारांचे मत आहे. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात मिळालेली ही राजकीय साथ प्रभागातील निवडणूक चित्र अधिक स्पष्ट करणारी ठरत आहे.

या पाठींब्यामुळे भाजपाच्या प्रचाराला नवीन गती मिळाली असून, तडवी यांची उमेदवारी आता अधिक मजबूत बनली आहे. स्थानिक पातळीवरील आदिवासी समाजातील एकजूट, आंतरिक राजकीय समिकरणे आणि प्रभागातील नेतृत्वाचा प्रभाव या सर्व घटकांवर या निर्णयाचा परिणाम स्पष्टपणे जाणवत आहे. प्रभागातील मतदारांमध्येही या घटनाक्रमाची मोठी चर्चा सुरू असून, निवडणूक समीकरणे निर्णायक वळण घेण्याची शक्यता वाढली आहे.


Protected Content

Play sound