Home Cities मुक्ताईनगर मुक्ताईनगर प्रभाग १४ व १७ मध्ये रक्षाताई खडसे यांची भव्य प्रचार रॅली 

मुक्ताईनगर प्रभाग १४ व १७ मध्ये रक्षाताई खडसे यांची भव्य प्रचार रॅली 

0
114

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर नगरपंचायत निवडणूक 2025 च्या प्रचाराला जोरदार सुरुवात झाली असून, भाजपच्या अधिकृत उमेदवारांच्या समर्थनार्थ शहरातील प्रभाग क्रमांक १४ आणि १७ मध्ये  काढण्यात आलेल्या केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या प्रचार रॅलीला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. नगराध्यक्ष पदासाठी आणि नगरसेवक पदांसाठी भाजप उमेदवारांना जिंकवण्यासाठी पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले.

प्रचार रॅली दरम्यान रक्षाताई खडसे यांनी प्रभागातील मतदारांच्या धावत्या भेटी घेतल्या. त्यांनी घराघरांत जात नागरिकांशी संवाद साधत भाजपा उमेदवारांना बहुसंख्य मतांनी निवडून देण्याचे आवाहन केले. त्यांनी मुक्ताईनगरचा सर्वांगीण विकास हा भाजपचा ध्यास असून, शहरातील प्रलंबित नागरी प्रश्न सोडवण्यासाठी सक्षम नेतृत्व आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. नागरिकांनीही त्यांना उत्साहाने प्रतिसाद देत भाजपच्या उमेदवारांबद्दल सकारात्मक भावना व्यक्त केली.

नगराध्यक्ष पदासाठी अधिकृत भाजप उमेदवार सौ. भावना ललित महाजन यांना रॅलीतून प्रचंड पाठिंबा मिळाला. शहरविकासाच्या दृढ बांधिलकीसह त्या नागरिकांशी संवाद साधत महिलांच्या सुरक्षिततेपासून पायाभूत सुविधांच्या उभारणीपर्यंतच्या मुद्द्यांवर मतदारांशी चर्चा करत असल्याचे दिसून आले. युवा, महिला व ज्येष्ठ नागरिकांकडून त्यांचे स्वागत करण्यात आले.

प्रभाग क्र. १४ चे भाजप उमेदवार संजिव निनू झांबरे हे रॅलीमध्ये सक्रिय दिसून आले. स्थानिक पातळीवरील पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता आणि प्रकाशयोजना यांसारख्या मूलभूत सोयींचा विकास हे आपले प्रमुख प्राधान्य असल्याचे त्यांनी मतदारांना सांगितले. प्रभागातील स्थानिक प्रश्नांवर त्यांनी केलेली थेट चर्चा नागरिकांना भावली.

प्रभाग क्र. १७ च्या भाजप उमेदवार सौ. अनुसयाबी सुपडा चिंचोले यांनी रॅलीत महिलांच्या विकासाच्या आणि स्वावलंबनाच्या मुद्द्यांवर विशेष भर दिला. त्यांनी क्षेत्रातील नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधत स्थानिक अडचणी जाणून घेतल्या. त्यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करून नागरिकांनी त्यांचे स्वागत केले.

या प्रचार रॅलीत भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ढोल-ताशांच्या निनादात, घोषणांनी दणाणलेल्या वातावरणात रॅलीची शोभा वाढली. रॅलीत सहभागी असलेल्या कार्यकर्त्यांनी “विकासासाठी भाजपच” असा नारा देत जनसमर्थन मिळवण्याची धडाडी दाखवली.


Protected Content

Play sound