
मुक्ताईनगर– लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर नगरपरिषद निवडणुकीचा माहोल चांगलाच तापला असून शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार सौ. संजना चंद्रकांत पाटील आणि नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे. शहरात या कार्यक्रमाची मोठी उत्सुकता असून संपूर्ण प्रशासन सज्ज करण्यात आले आहे.

उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर बराणपूर रोडवरील संत मुक्ताबाई महाविद्यालयाच्या पटांगणात विशेष हेलिपॅडची उभारणी करण्यात आली आहे. येथून ते थेट सभास्थळी रवाना होतील. त्यापूर्वी ते छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला अभिवादन करणार असून यावेळी भव्य रोड शो आयोजित करण्यात आला आहे. हा रोड शो शहरातील प्रमुख मार्गांवरून जात असल्याने नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे.
रोड शो संपल्यानंतर प्रवर्तन चौकात आणि मुख्य चौकात एक विशाल सभा आयोजित करण्यात आली आहे. ही सभा निवडणूकपूर्व सर्वात महत्त्वाची ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शिंदे यांच्या भाषणातून महायुतीच्या विकास धोरणांवर भर दिला जाणार असून शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारांना मोठी पाठबळ मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सभेच्या सुरळीत आयोजनासाठी पोलीस प्रशासन पूर्ण अलर्टवर असून अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी बडगुजर यांनी जागा पाहणी करून सुरक्षा बंदोबस्ताचा आढावा घेतला आहे. स्वतः चंद्रकांत पाटील यांनीही संपूर्ण तयारीचे निरीक्षण करून प्रत्येक विभागाला आवश्यक सूचना दिल्या.
सभेसाठी विशाल पंडाल, ध्वनीप्रणाली, प्रकाशयोजना तसेच वाहतूक नियंत्रणाची विशेष तयारी पूर्ण झाली आहे. शहरातील विविध ठिकाणी बॅनर, पोस्टर आणि स्वागत कमानींनी वातावरण रंगतदार बनले असून हजारो नागरिक सहभागी होतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.



