Home Cities भुसावळ रजनीताई सावकारे यांच्या प्रचार दौऱ्यात कार्यकर्त्यांचा सक्रिय सहभाग

रजनीताई सावकारे यांच्या प्रचार दौऱ्यात कार्यकर्त्यांचा सक्रिय सहभाग

0
110

भुसावळ- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भुसावळ नगरपरिषद निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. रजनीताई संजय सावकारे यांच्या प्रचाराला मोठी गती मिळत असून प्रभाग क्रमांक 11 आणि 19 मधील दौऱ्यात नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बुधवारी झालेल्या या प्रचार दौऱ्यात दोन्ही प्रभागातील उमेदवार बबलू बरहाटे आणि मेघा वाणी हे विशेषतः सहभागी झाले होते.

प्रचारादरम्यान भारतीय जनता पार्टी-शिवसेना-रिपाइं-लहुजी शक्ती सेना महायुतीचे सर्व पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक, मोर्चा-आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. परिसरातील प्रमुख मान्यवर आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमुळे प्रचाराला आणखी जोम चढला. शहराध्यक्ष संदीपदादा सुरवाडे, किरणभाऊ कोलते, सरचिटणीस पवनभाऊ बुंदेले, अमोलभाऊ महाजन यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.

प्रभागातील नागरिकांशी संवाद साधताना रजनीताई सावकारे यांनी विकासाचे सातत्य राखणे, पाणीपुरवठा, स्वच्छता व्यवस्था, रस्ते-सांडपाणी प्रकल्प, महिलांसाठी सुरक्षित वातावरण आणि युवकांसाठी रोजगारसंधी निर्माण करण्याचे आश्वासन दिले. महायुतीच्या उमेदवारांना मिळणारा वाढता जनसमर्थन लक्षात घेता दोन्ही प्रभागांत उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

या प्रचार दौऱ्याची सुरुवात प्रभाग 11 आणि 19 मधील विठ्ठल मंदिर परिसरातून झाली. देवस्थानात दर्शन घेऊन विजयाची कामना करण्यात आली आणि त्यानंतर पदयात्रेला जोरदार प्रारंभ मिळाला. समर्थकांकडून घोषणाबाजी, ढोल-ताशांचे नाद आणि गुलालाच्या वर्षावाने वातावरण दणाणून गेले.

भुसावळच्या नागरिकांकडून महायुतीच्या उमेदवारांना मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता आगामी निवडणुकीत प्रभाग 11 आणि 19 मध्ये तीव्र आणि रोचक लढत होण्याची शक्यता अधिक बळावली आहे.


Protected Content

Play sound